राज्यातील साखर कारखान्यांच्या तुलनेत संगमनेर कारखान्याचा आलेख सतत चढता राहिला आहे. चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही परिस्थितीत चांगला भाव देण्याची परंपरा आपण जोपासली आहे. त्यामुळे कुणी जादा भावाचे आमीष दाखवले तरी यावर्षीच्या कठीण समयी ऊस उत्पादकांनी कारखान्यासोबत राहण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज श्री. थोरात यांच्या हस्ते झाला. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे अध्यक्षस्थानी होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, पं. स. सभापती सुरेखा मोरे, नगराध्यक्ष दिलीप पुंड, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, सुरेश थोरात, मधुकरराव नवले आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात सहकाराची पायाभरणी केली. त्यांच्याच आदर्शानुसार सहकाराची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. पाटपाणी नसताना कठीण स्थितीत कार्यक्षेत्रात ऊसाचे पीक उभे आहे. जादा ऊसउत्पादन असतानाही कारखान्याने कार्यक्षेत्राबरोबरच बाहेरच्या उसालाही सर्वाधिक भाव दिला आहे. आता अडचणीच्या काळात ऊस उत्पादकांनी कारखान्याला साथ दिली पाहिजे. काही लोक जादा भावाचे आमीष दाखवतील, मात्र नेहमी सोबत राहणाऱ्यांची साथ सोडू नका, आपले नाते कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. भंडारदरा आणि निळवंडे दोन्ही धरणे भरली आहेत. मात्र, दुष्कळी स्थितीचा विचार करता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचेही आवाहन त्यांनी केले. आमदार तांबे, कानवडे यांचीही भाषणे झाली. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन, तर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले.

दिवाळीत ७५ कोटींचे वाटप
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर कारखान्याच्या माध्यमातून २१ कोटी, दूध संघाकडून ४९ कोटी, तर पतसंस्थांच्या माध्यमातून पाच कोटी असे सुमारे ७५ कोटी रूपयांचे वाटप होणार आहे. एवढी रक्कम सभासदांपर्यंत पोहोचवणारा संगमनेर हा राज्यातील एकमेव तालुका असावा. याशिवाय कामगारांना २० टक्के बोनस व सानुग्रह अनुदान मिळून साडेतीन महिन्यांचा पगार देण्याची घोषणा थोरात यांनी केली.