‘शिक्षणाधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा ’
शिक्षणाधिकारी कार्यालय दलालांचा अड्डा बनल्याचा आरोप शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केला, तर शिक्षकांना वेठबिगार समजू नका, अशा शब्दात आमदार डॉ. रणजित पाटील यांनी ठणकावून माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.के.पवार यांच्याविरुध्द शिक्षण उपसंचालकांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सहविचार सभेत आमदार गाणार व आमदार डॉ. पाटील बोलत होते. म.रा.शिक्षक परिषदेची सहविचार सभा शिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. उपस्थित दोन्ही आमदारांनी प्रलंबित वेतन देयके, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी, वैद्यकीय परिपूर्तीबाबतची स्थिती जाणून घेतली. उपस्थित शिक्षणाधिकारी पवार यांनी ५५४ बिले मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी आमदार डॉ.पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तुम्ही शिक्षकांना वेठबिगार समजू नका व त्यांच्या भावनांशी खेळू नका. बिले मंजूर करतांना दहा टक्क्यांची मागणी बंद करा अन्यथा, तुमच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे ठणकाविले, तर शिक्षक आमदार गाणार यांनी सांगितले की, शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील काम कार्यालयात बसूनच पूर्ण करावे. वैद्यकीय खर्चाची बिले त्वरित मंजूर करावी, महत्त्वाची कागदपत्रे रजिष्टर पोस्टाने पाठविण्यात यावी, अशा सूचना करून शिक्षणाधिकारी कार्यालय दलालांचा अड्डा बनला असून यापुढे दोषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका. वेळेत पूर्ण करा, असा सल्ला आमदार गाणार यांनी दिला. यावेळी उपस्थित शिक्षण उपसंचालक श्रीराम पवार यांनी जिल्ह्य़ात बिहारपेक्षाही बोगस स्थिती आहे, असे सांगितले. म.रा.शिक्षक परिषद व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सहविचार सभेत वैद्यकीय परिपूर्ती बिले मंजूर करण्यास व उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पत्र पाठविण्यास विलंब करणे, अनेक अनुदानित शाळेवर प्रभारी मुख्याध्यापकांची चुकीची नेमणूक करणे आदी विविध आरोप शिक्षणाधिकारी एस.के.पवार यांच्यावर ठेवण्यात आले होते. या सहविचार सभेला शिक्षणाधिकारी श्रीकृष्ण पवार, गजानन पाटील, उपशिक्षणाधिकारी राजगुरू, गोटे, श्रीकृष्ण अवचार, बारहाते, राजेंद्र चोथवे, जिल्हाध्यक्ष रोकडे, अफसर हुसेन यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते.