गर्भलिंग निदान करताना माणिकनगर येथील मातोश्री हॉस्पिटलच्या डॉ. तनुजा व डॉ. श्रीनिवास बरडे या दाम्पत्याला महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या विभागीय दक्षता पथकाने सापळा रचून पकडले. गर्भलिंग निदान केलेल्या सोनोग्राफी यंत्राला या वेळी सील ठोकण्यात आले, तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील एजंट महिलेसह ऑटोचालकाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त जी. श्रीकांत यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विभागीय दक्षता समितीने शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई केली. बनावट लाभार्थीच्या माध्यमातून शहरात बेकायदा सुरू असलेल्या गर्भलिंग निदान केंद्राचा भंडाफोड केला. डॉ. बरडे दाम्पत्याने एका महिला एजंटच्या माध्यमातून बनावट लाभार्थीची सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान केले. विभागीय तांत्रिक अधिकारी डॉ. माधव मुंडे, दक्षता अधिकारी दौलत मोरे, महिला सदस्या ज्योती हेगडे, विधी समुपदेशक अॅड. पूजा राठोड यांनी सापळा रचून ही कारवाई केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नारायण राठोड व मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मीरा कुलकर्णी यांना कारवाईनंतर या पथकाने बोलावून घेतले. डॉ. तनुजा बरडे यांच्या नावाने असलेल्या या केंद्राला टाळे ठोकण्यात आले. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली.
मनपा क्षेत्रात एक हजार मुलांमागे सन २०११ मध्ये ८६१, तर मागील वर्षी ८८५.६० असे मुलींचे प्रमाण आहे. गेल्या मार्च-एप्रिलचा संदर्भ तपासल्यास हे प्रमाण अनुक्रमे ८८१ व ८९१ असे आहे. गर्भलिंग निदान कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपाचे संयुक्त प्रयत्न सुरू असून, त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत.