सध्या नागपूरसह विदर्भातील कमाल तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानापासून अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या सुमारास उन्हापासून बचाव करावा, आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन शहरातील डॉक्टरांनी केले आहे. विशेषत: लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्य़ातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. त्यात दिवसेंदिवस आणखी वाढ होत असल्याने नागरिकही धास्तावले आहेत. त्यातच सध्या विवाहाची ‘धूम’ असल्याने लहानांसह मोठेही घराबाहेर पडत आहे. परंतु ऊन्हाचा परिणाम प्रकृतीवर होत असल्याने आवश्यक असेल तेव्हाच ऊन्हात बाहेर पडावे. काही तरी खाऊनअथवा दोन ग्लास पाणी पिऊनच घराबाहेर पडावे. ऊन्हात फिरल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण एकदम कमी होते. अशा वेळी लिंबू सरबत, टरबूज, खरबुजाचा वापर करावा. उघडय़ावरील अन्न खाऊ नये. विशेषत: बर्फाचे पाणी किंवा त्यापासून बनविलेले आइस्क्रीम खाऊ नये. त्यामुळे गॅस्ट्रो किंवा टायफाईड होण्याची शक्यता असते, असे मत मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.बी हेडाऊ यांनी व्यक्त केले आहे. लहान बालकांनी, गर्भवती महिलांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू नये. लहान बालकांना उलटय़ा होत असेल तर त्याला साखर आणि मिठापासून बनविलेली जलसंजीवनी द्यावी. औषध दुकानात ओ.आर.एच.चे पॉकेट मिळते. त्याचा वापर करावा. जेथे लहान बालके आहेत, त्या घरी ओ.आर.एच.चे पाकीट असलेच पाहिजे. उन्हात फिरल्यामुळे तापही येऊ शकतो. अशावेळी रुग्णाच्या अंगावर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ डॉ. आर.जी. पाटील यांनी दिला आहे. उन्हात फिरल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे फारच महत्त्वाचे काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना डोळ्यावर गॉगल व डोक्यावर टोपी अथवा दुपट्टा वापरावा. घराबाहेर पडताना पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. उन्हात फिरल्यामुळे शरीर काळे पडण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा शरीर झाकले जाईल, असे सैल कपडे वापरावे. शून्य ते एक वर्षे वयाच्या मुलाची विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. सध्या शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात कॉलरा, गॅस्ट्रो आणि तापाच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. दूषित पिण्याचे पाणी व उघडय़ावरील अन्न खाल्याने गॅस्ट्रो होतो. उन्हात फिरल्याने ताप अथवा थकवा लवकर येतो. अशी लक्षणे दिसताच रुग्णांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

ही खबरदारी घ्यावी
– घरातून बाहेर निघताना सनस्क्रीन लोशन लावावा. स्कार्फ, समरकोट घालूनच बाहेर जा. पाणी जास्त प्रमाणात प्या.
– डोळ्यांना सूर्याच्या तेज किरणांपासून बचावासाठी चांगल्या क्वॉलिटीचे सनग्लास वापरा.
– बाहेर पडताच पाण्याची बॉटल शक्यतोवर सोबत ठेवा. त्यात ग्लुकोज किंवा लिंबू पाणी मिळवल्यास उत्तम.
– उन्हातून आल्यानंतर कुलर, वातानूकुलीन यंत्रणेत (एसी) जाऊ नये. प्रथम काही वेळ सावलीत थांबावे. नंतर शरीराचे
– तापमान कमी झाल्यानंतरच कुलर, एसीत जावे.