राज्यातील अठरा जिल्ह्य़ांतील एक्केचाळीस दलित कवयित्रींची माहिती आणि त्यांच्या मुलाखती ‘आम्ही सूर्याच्या लेकी दलित कवयित्री’ या माहितीपटाच्या माध्यमातून पाहता येणार असून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये पीएच.डी. करताना एका विद्यार्थिनीने या माहितीपटाची निर्मिती केली आहे.
पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये ‘दलित कवयित्रींची कविता एक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. करताना डॉ. जया जगताप पाटील यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. चंद्रपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्य़ांमधील अगदी छोटय़ा खेडेगावांमध्ये फिरून त्यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे.
या खेडेगावांमध्ये राहणाऱ्या साधारण ३० ते ७० या वयोगटातील ४१ कवयित्रींच्या मुलाखती या दीड तास कालावधीच्या माहितीपटाद्वारे पाहायला मिळणार आहेत. या माहितीपटाचे बुधवारी लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 या लोकार्पण सोहळ्यासाठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अरूण अडसूळ उपस्थित राहणार आहेत. या माहितीपटाविषयी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, ‘‘डॉ. जगताप यांनी तयार केलेला हा माहितीपट साहित्याच्या अभ्यासकांसाठी मोठा ठेवा ठरणार आहे. नव्या संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळेल.’’