भारतीय जीवनशैली ही भारतीय कमी आणि विदेशी अधिक होत चालली आहे. विषय कोणताही असला तरी ओढा विदेशीकडेच अधिक असतो. कुत्री दत्तक घ्यायची असतील तरीही ती विदेशीच असावी असा आग्रह असतो. मात्र, भारतीय कुत्री त्यावर मात करू शकतात हे ‘पेटा’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या वार्षिक ‘क्युटेस्ट इंडियन डॉग’ स्पध्रेने सिद्ध केले. भारतीय प्रजातीची कुत्री आणि त्यांच्या बचावाच्या कथा या विषयावर आयोजित या स्पध्रेत नागपुरातील पीयूष चोपावार यांनी जीवदान दिलेल्या आणि पालकत्व स्वीकारलेल्या ‘मॅगी’ या कुत्र्याने बाजी मारली.
भर पावसात महाविद्यालयाच्या शेजारी एक-दोन नव्हे तर सहा कुत्री कापडात गुंडाळून ठेवलेली पीयूष चोपावार यांना दिसली. भेदरलेली अवस्था आणि कुणीतरी जीवदान देईल या अपेक्षेने ती सर्व केविलवाण्या नजरेने बघत होती. चोपावार यांनी लागलीच त्या सहाही पिलांना उपचारासाठी पशुवैद्यकाकडे नेले. त्यातील ‘मॅगी’ची नजर मात्र अधिकच केविलवाणी होती. त्यामुळे चोपावार यांनी त्याला कायमचे आपल्याकडे ठेवून घेतले. त्यांच्या घरातील तो एक सदस्य झाला आहे.
पीयूष चोपावारने जीवदान दिलेल्या कुत्र्याच्या या सुरस कथेने पेटा या संस्थेचे सर्वच पदाधिकारी अचंबित झाले. पेटाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्वा जोशीपुरा यांच्या मते, मॅगी हा खरोखरच नशीबवान कुत्रा आहे आणि त्याच्या येण्याने चोपावार यांच्याही आयुष्यात प्रेम आणि आनंदाची भरती आली आहे. लोकांकडून जीवदान मिळालेली सर्वच कुत्री विजेती आहेत, असे मत त्यांनी विजेते घोषित करताना केले. सर्वात सुंदर भारतीय कुत्र्याचा मान पटकावणाऱ्या विजेत्या कुत्र्याला १०० टक्के भारतीय कुत्रा अशी कुत्र्याची टी शर्ट आणि त्याच्या पालकाला जीवदान दिलेला माझा कुत्रा असे लिहिलेले टी शर्ट आणि पेटा इंडियाचे संस्थापक इन्ग्रीड न्युकीर्कचे पुस्तक देण्यात आले. द्वितीय आणि तृतीय पुरस्कार विजेत्यालासुद्धा पारितोषिके देण्यात आली. भारतीय प्रजातीचीच कुत्री दत्तक घेण्याचे आवाहन यावेळी पेटाच्यावतीने करण्यात आले. विशेषत: रस्त्यावरील भटकी कुत्री किंवा पिंजऱ्यातील कुत्र्यांना दत्तक घेण्याचे आवाहन पेटाने यावेळी केले. कित्येकदा पेट शॉपमधील आणि संकरित प्रजातीच्या कुत्र्यांमुळे विविध आजार उद्भवण्याचा धोका असतो. दमा, कर्करोग, हृदयरोग अशा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. भारतीय प्रजातीची कुत्री मात्र आरोग्यदायी आणि अधिक बळकट असल्यामुळे दत्तक घेताना याच कुत्र्यांचा विचार करावा, असे आवाहन पेटाच्यावतीने यावेळी करण्यात आले.