डोंबिवलीतल्या एमआयडीसीतील मॉडेल महाविद्यालयामध्ये सकाळची वेळ म्हणजे विद्यार्थ्यांची लगबग.. मात्र बुधवारी या महाविद्यालयातील चित्र खूपच वेगळे होत. आदल्या रात्री याच महाविद्यालयातील मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे दडपण महाविद्यालयाच्या आवारात सहज जाणवत होते. सकाळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या अतिशय तुरळक होती. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले. विद्यार्थ्यांमध्येही याच विषयावर दबक्या आवाजात चर्चा होती.
 सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीमधील महाविद्यालयीन तरुणीवरील सोमवारी रात्री घडलेल्या प्रसंगामुळे बुधवारी ती शिकत असलेल्या महाविद्यालयात काहीसे सुन्न वातावरण होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांनी या प्रकरणाचा धसका घेतला होता. बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांपर्यंत या प्रकाराची माहिती पोहोचली आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने तात्काळ विद्यार्थ्यांना घरी जाण्याच्या सूचना केल्या. सोमवारी रात्री महाविद्यालयातील वर्गमित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या मैत्रिणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी महाविद्यालयामध्ये हजर झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये याच विषयाची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. आत्तापर्यंत आजूबाजूला घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना ऐकत होतो. आमच्याच कॉलेजमध्ये असा प्रसंग घडल्याने मुलांमध्ये दहशत आहे असे येथील प्राध्यापक वर्गाचे म्हणणे होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणातील गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालक या सर्वानी या निवेदनावर सह्या केल्या.