कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक व शहराच्या आतील भागात विविध वस्तूंचे सेल लागले आहेत. काही ठिकाणी मखर विकणारी प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. येथे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत ध्वनिक्षेपकावरून आपल्या वस्तूंची जाहिरात करणारी यंत्रणा सतत किटकिट करीत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत.
रेल्वे स्थानक भागात गेल्या काही दिवसांपासून विविध वस्तूंचा सेल लागला आहे. या सेलच्या ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ध्वनिक्षेपकावरून वस्तूंची जाहिरात करण्यात येते. ध्वनिक्षेपकाचा आवाज लहान असला तरी तो सतत कानावर किटकिट करीत असल्याने या भागात राहणारे रहिवासी हैराण झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, वृद्धांनी याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांची दखल घेण्यात येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात होणारी ध्वनिक्षेपकावरील किटकिट पश्चिम भागातील काही सोसायटीतील रहिवाशांना अस्वस्थ करून सोडत आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित विक्रेत्याला तंबी देण्यात येईल, असे सांगितले.