डोंबिवली शहरातील ८० टक्के रिक्षा ‘सीएनजी’वर चालूनही शासन पातळीवरून या भागात ‘सीएनजी’ पंप सुरू करण्यास प्रयत्न करण्यात येत नसल्याने त्याचा निषेध म्हणून डोंबिवलीतील रिक्षा चालकांनी सकाळपासून रिक्षा बंद आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. शाळकरी मुलांनाही शाळेपासून घरापर्यंत पायपीट करावी लागली.
गेली दोन वर्षे डोंबिवलीतील रिक्षा चालक ‘सीएनजी’ पंप सुरू करण्याची मागणी करीत आहेत. राजकीय नेते वेळोवेळी हे केंद्र डोंबिवलीत सुरू करण्यासाठी व्यासपीठावरून आश्वासने देत आहेत. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रदूषण टाळण्यासाठी शासनाकडून सीएनजी पंपांना प्राधान्य देण्यात आले आहे. बहुतेक चालकांनी सीएनजीवर रिक्षा चालवणे पसंत केले आहे. सीएनजीवर गॅस भरण्यासाठी डोंबिवलीतील रिक्षाचालकांना महापे किंवा कोन येथे जावे लागते. तेथे रिक्षाचालकांच्या यापूर्वीच रांगा असतात. तसेच, स्थानिक चालक दादागिरी करून मध्येच रिक्षा घुसवतात. त्यामुळे गॅस भरण्यासाठी महापे, कोन येथे गेल्यानंतर अर्धा दिवस फुकट जातो. प्रवासी वाहतूक होत नसल्याने भाडे बुडते असे काही रिक्षाचालकांनी सांगितले.
या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील रिक्षा संघटनांनी रिक्षा बंद आंदोलन सुरू केले. अचानक वाहनतळावरील रिक्षा गायब झाल्याने काही वेळ नागरिकांना काहीच कळेनासे झाले. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करू, पण रिक्षा बंद करू नका असे आवाहन केले. चालकांनी त्या आवाहनाला दाद दिली नाही. दुपारी शाळा सुटताच पालकांना मुलांना पायपीट करत घरी आणावे लागले. रिक्षा बंदमुळे एमआयडीसी, नांदिवली, सोनारपाडा, मानपाडा, काटई, देवीचापाडा, गणेशनगर, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा भागात जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले.
प्रक्रिया सुरू आहे
‘डोंबिवलीत सीएनजी केंद्र सुरू करण्यासाठी तीन ते चार प्रस्ताव आले आहेत. या केंद्रासाठी राज्य व केंद्र शासनाकडून एकूण १८ परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे केंद्र सुरू होईल. पेट्रोलपंप चालक हे केंद्र सुरू करू शकतात. त्यासाठी सुमारे दीड कोटीचा खर्च आहे. त्यामुळे हे आव्हान पटकन कोणी स्वीकारत नाही. शासनावर दबाव टाकण्यासाठी चालकांनी बंद पुकारला आहे’, असे रिक्षा संघटनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले.  
डोंबिवली पश्चिमेत पेट्रोल पंप होणार
डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडी किनाऱ्याजवळ पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहे. दोन ते तीनप्रस्ताव आले आहेत. मोठागावाजवळ हा पेट्रोल पंप व्हावा यासाठी स्वत: सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवलकर प्रयत्नशील आहेत. डोंबिवली पश्चिमेत पेट्रोल पंप झाला तर वाहने पेट्रोल, डिझेलसाठी पश्चिम भागात राहतील. पूर्व भागात वाहतूक कोंडी होणार नाही हाही यामागचा उद्देश आहे. हा पंप सुरू झाला की याच भागात सीएनजीसाठी प्रयत्न केले जातील, असे पालिका स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
रिक्षा सीएनजीवर, भाडे पेट्रोलचे
डोंबिवलीतील बहुतेक रिक्षा सीएनजीवर चालतात. सीएनजीचा दर कमी आहे. पण रिक्षा चालक प्रवाशांकडून भाडे घेताना पेट्रोलचा दर वसूल करतात. पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत रिक्षा चालकांनी एक रुपयांनी दरवाढ केली. पण पेट्रोल दरवाढ कमी झाल्यानंतर रिक्षा चालकांनी भाडेवाढ कमी केली नाही. रिक्षा चालक सीएनजीवर रिक्षा चालवतात मग यापूर्वी वाढवलेला दर त्यांनी कमी करावा व सीएनजी दराप्रमाणे भाडे घ्यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.