डोंबिवलीजवळील दावडी येथे झालेल्या रसायन टँकर स्फोटातील चार आरोपींना न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. स्फोट झालेला टँकर दावडीजवळील अलकेम लॅबोरेटरीज या कंपनीतून लिलावातून खरेदी करण्यात आला होता. त्यामुळे या कंपनीचा व्यवस्थापक प्रकाश शंकर पवार (वय ५५) यालाही मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. स्फोट झालेला टँकर गोदाम मालकांनी कोठून आणला होता याचा शोध पोलीस घेत होते. अलकेम कंपनीतून हे रसायन टँकर दावडीचा सरपंच गणपत बामा पाटील याने लिलावातून खरेदी केले होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने गणपत पाटील, गोदाम मालक राजेश गुप्ता, मनोजकुमार गुप्ता व व्यवस्थापक प्रकाश पवार यांना १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी रामतीरथ शहानी, शिवकुमार शर्मा यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे. दरम्यान, दावडी येथील गोदाम स्फोटातील जखमी तसेच नुकसान झालेल्या चाळ रहिवाशांना शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.