डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कोणताही वचक नसल्यामुळे काही रासायनिक कंपन्यांचे दूषित पाणी खाडीत सोडले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
कंपन्यांमधून बाहेर सोडण्यात येणाऱ्या वाहिन्यांचे चेंबर्स अनेक ठिकाणी फुटले आहेत. ही डागडुजी संबंधित कंपनी, एमआयडीसी, सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अधिकारी यांच्या समन्वयाने होणे आवश्यक आहे. मात्र, असे होत नसल्याने संबंधित कंपन्या रासायनिक सांडपाणी थेट वाहिन्यांमधून खाडय़ांना सोडण्याचे काम करतात. हेच पाणी भंगार, फेरीवाले प्लॅस्टिक पिशव्या धुणे या कामासाठी वापरतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या फेज एकमधील जय सव्‍‌र्हिस सेंटरजवळील भूखंडातून जाणाऱ्या वाहिनीतून रासायनिक सांडपाणी वाहत असते, अशा तक्रारी आहेत. या ठिकाणचा चेंबर फुटला आहे. अशाच प्रकारचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. फुटलेल्या वाहिन्या तसेच चेंबर दुरु स्तीसाठी लाखो रुपये खर्च केल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात येत असले तरी तो निधी कोठे खर्च झाला असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांची उदासीनता, पोलिसांची तडजोडीची भूमिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे प्रदूषणाचे फवारे घेत एमआयडीसी परिसरातील रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत.