सुसंस्कृत, सुशिक्षित व उत्सवप्रेमी शहर म्हणून नावारूपास आलेले डोंबिवली शहर बकालपणाकडे वाटचाल करीत आहे. शहराचा उकीरडा झाला आहे. काही नगरसेवक, आमदारांनी या उकीरडय़ावर आपल्या ‘पोळ्या’ भाजण्याचे काम सुरू केले आहे. राजकीय दहशतीचा कधी नव्हे असा एक नवा अंकुर डोंबिवलीत फुटत चालला आहे. या सर्व मोंगलाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजूट करणे आवश्यक असल्याची जाणीव झाल्याने डोंबिवलीतील सुज्ञ, दक्ष आणि काही कायदाप्रेमी नागरिकांनी बिगरराजकीय चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवलीतील राजकीय दहशत आणि बकालपणावर गेल्या काही दिवसांपासून ‘लोकसत्ता’ने आवाज उठविला. शहरातील संस्कृतिरक्षकांचे ‘नवे’ मुखवटे समाजासमोर आणले. ‘लोकसत्ता’चे हे घाव जिव्हारी लागल्याने अनेक कायदाप्रेमी डोंबिवलीकरांना आता आपल्यावर आपल्या शहराचे रक्षण करण्याची जबाबदारी आल्याची जाणीव झाली आहे. या भावनेतून डोंबिवलीतील वकील, प्रसिद्ध वास्तुविशारद, ‘प्रामाणिक’ विकासक, प्राध्यापक, डॉक्टर, सनदी लेखापाल, काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी अशा अनेक जणांचा एक बिगरराजकीय गट प्राथमिक स्तरावर स्थापन करण्यात येत आहे. या गटाच्या निमंत्रकांपैकी एक निमंत्रक प्रसिद्ध सनदी लेखापाल, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संचालक, प्रा. उदय कर्वे यांनी ही माहिती दिली. ‘स्वच्छ, सुंदर व अधिकृत डोंबिवली’ या उद्देशातून कायद्याच्या चौकटीत राहून शहर विकासासाठी कार्यरत राहणे हे या बिगरराजकीय चळवळीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
डोंबिवलीकरांना आवाहन
सामाजिक भावनेतून डोंबिवली शहरातील सुरक्षा, स्वच्छता, अनधिकृत बांधकामे व शहर विकासाशी निगडित प्रश्नांवर ज्या तरुण, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांना काम करायचे आहे. कोणीही मंडळी या बिगरराजकीय चळवळीत काम करू शकतात. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी प्रा. उदय कर्वे यांच्याशी मोबाइल क्र. ९८१९८६६२०१ येथे किंवा ‘व्हॉइसऑफडोंबिवलीअ‍ॅटजीमेल.कॉम’. ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.फेसबुक.कॉम/व्हॉइसऑफडोंबिवली’ येथे संपर्क करावा.  
घरासाठी बिगरराजकीय
गटाने केलेल्या सूचना
ल्ल  एखाद्या नागरिकाला कोठल्याही इमारतीत भाडय़ाने किंवा विकत घर, गाळा घ्यावयाचे आहे त्या नागरिकाने पालिकेशी संपर्क करून आपण घेत असलेले घर अधिकृत की अनधिकृत आहे याची खात्री करून घ्यावी. पालिकेने नागरिकाला त्या विशिष्ट इमारतीतील त्या घराच्या वैधतेचे प्रमाणपत्र (क्लीअरन्स प्रमाणपत्र) साक्षांकित प्रतीमध्ये द्यावे. अशी अ‍ॅडव्हान्सड रुलिंगची सोय पालिकेने सशुल्क पद्धतीने सुरू करावी.
ल्ल संबंधित इमारतीचा बांधकाम प्रारंभ दाखला, एकूण मजल्यांचा मंजूर नकाशा प्रत्येक खरेदीदाराला उपलब्ध करून द्यावा. सर्व सदनिकांच्या साक्षांकित मूळ प्रती द्याव्यात. आराखडय़ाच्या अस्पष्ट प्रती देऊन खरेदीदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.
ल्ल पालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असल्याशिवाय पालिकेने पाणी, महावितरणने वीज जोडणी देऊ नये.
ल्ल इमारतीत घर, गाळा खरेदी करणाऱ्या नागरिकाला विकासकाने पालिकेचे बांधकाम अधिकृत असल्याचे पत्र द्यावे. त्या पत्राशिवाय उपनिबंधक कार्यालयाने त्या व्यवहाराची नोंदणी करू नये. बँकेने कर्ज देऊ नये.
ल्ल शहरात ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, सुरू आहेत त्यांची माहिती वर्तमानपत्रातून किंवा जाहिरात फलक माध्यमातून नागरिकांना पालिकेने जाहीरपणे द्यावी. मार्गदर्शक सूचना आवश्यक ठिकाणी लावाव्यात.