महाराष्ट्र विद्युत नियमन आयोगाच्या १६ ऑगस्ट २०१२ च्या आदेशानुसार वाशीम प्रविभागातील दरमहा ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या लघु दाब व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना घरगुती वीज दराने त्वरित आकारणी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस
डॉ. दीपक ढोके यांनी येथील विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.
या निवेदनात डॉ. दीपक ढोके यांनी महाराष्ट्र विद्युत नियमन आयोगाच्या १६ ऑगस्ट २०१२ च्या आदेशाचा उल्लेख करून विद्युत वितरण कंपनीने वाशीम प्रविभागातील दरमहा ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या वाणिज्यिक ग्राहकांना घरगुती वीज दराने १ ऑगस्ट २०१२ पासून वीज देयके मिळणे अपेक्षित होते, परंतु आयोगाच्या ‘त्या’ आदेशाची अद्यापपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप केला आहे. या मागणीसंदर्भात वाशीम जिल्ह्य़ात भाजपने व राज्यात विविध वीज ग्राहक संघटनांनी आयोगाकडे दाद मागितली होती. महाराष्ट्र विद्युत नियमन आयोगाने प्रकरण क्रमांक ११२/२०१२ अन्वये १६ जुलै २०१३ ला अंतिम आदेश ग्राहक हितासाठी मंजूर केला आहे. या आदेशान्वये विद्युत वितरण कंपनीने तात्काळ या आदेशाची अंमलबजावणी करून
१ ऑगस्ट २०१२ पासूनची अतिरिक्त दराने करण्यात आलेली वीज देयकाची आकारणी घरगुती दराने करून संबंधित वीज ग्राहकांना लाभ देऊन येणाऱ्या देयकामधून अतिरिक्त झालेली वसुली समायोजित करण्याची आवश्यकता होती. परंतु येथील अधीक्षक अभियंत्यांनी या आदेशाची अद्यापही अंमलबजावणी केली नसल्याचे या निवेदनात डॉ. ढोके यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दीपक ढोके यांनी येथील अधीक्षक अभियंत्यांना माहिती दिली असता त्यांनी याबाबत आमच्या कार्यालयाला कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगून ग्राहकांच्या न्याय्य मागणीला बगल दिल्याचा आरोपही या निवेदनात डॉ. ढोके यांनी केला आहे. महाराष्ट्र विद्युत नियमन आयोगाच्या या आदेशाची वाशीम जिल्ह्य़ात अंमलबजावणी करून संबंधित अन्यायग्रस्त वाणिज्यिक वीज ग्राहकांना घरगुती वीज दराने वीज देयकाची आकारणी विद्युत वितरण कंपनीने तात्काळ करावी, अशी मागणीही डॉ. दीपक ढोके यांनी या निवेदनात केली आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ऊर्जा राज्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अजय मेहता, मुख्य अभियंता (वाणिज्य) एम.एस. केळे, अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता धांडे आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांना पाठवल्या आहेत.