पती किंवा मित्रासोबतचे ‘ते’ क्षण खासच असतात. पण, आजकाल हे क्षण सेलफोनवर ‘व्हिडिओ’ किंवा ‘छायाचित्रां’मधून बंदिस्त करण्याचे फॅड वाढले आहे. पण, ही हौस अनेक तरूण-तरुणींना महाग पडू शकते. कारण, या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स किंवा छायाचित्रांचा जवळच्याच व्यक्तींकडून गैरवापर केल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे, आपला ‘सीन’ करून घ्यायचा नसेल तर अशा ‘ऑफसीन’ क्षणांना सेलफोन किंवा कॅमेरात बंदिस्त करणे टाळा, असा सल्ला सायबर सेलच्या पोलिसांनी दिला आहे.
ज्या मुलीवर आपण प्रेम करत होतो किंवा जी कधीकाळी आपली पत्नी होती, तिच्यासोबत काही कारणास्तव बिनसले की तिच्या छायाचित्रांचा गैरवापर करायचा, अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर पोलीस ठाण्यात खंडीने येतात. जवळच्याच नव्हे तर अनोळखी व्यक्तींकडूनही या प्रकारचे गुन्हे घडतात.
दिल्लीच्या एका २१ वर्षांच्या मुलाने चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला अशा पद्धतीने त्रास दिल्याचे प्रकरण पोलिसांनी उघडकीला आणले. हा मुलगा चेंबूरमध्येच या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाकडे राहण्यास आला होता. त्यावेळी त्याची या मुलीशी ओळख झाली.
ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्याने तिला लग्नाची मागणीही घातली. परंतु, तिने त्याचा प्रस्ताव नाकारला. हा दिल्लीत परतला तोच सुडाची भावना घेऊन. येथे आल्यावर त्याने तिचे छायाचित्र एका पोर्न साइटवर टाकून तिचा सेलनंबरही त्यावर दिला. शिवाय फेसबुकवर तिच्या नावे खोटे अकाऊंट बनवून त्यावरही तिची सर्व माहिती दिली. याचा परिणाम असा झाला की या मुलीला देशभरातूनच नव्हे तर कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलियामधूनही फोन येऊ लागले. यामुळे तिला प्रचंड मनस्ताप झाला. तिने पालकांच्या मदतीने या बाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोर्न साइट आणि फेसबुककडे विनंती करून याचा मागोवा काढला तेव्हा कुठे हा दिल्लीतला ‘रोमिओ’ हाती लागला.
या प्रकारची दुसरी केस नालासोपाऱ्यात घडली. छोटी-मोठी कामे करून कसाबसा आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका सडाफटिंग रोमिओला एका फॅशन डिझायनर तरूणींचा सेलफोन नंबर मिळाला. मग हा तिला फोनवरच अश्लील बोलून छळू लागला. नंतर तर हा पठ्ठय़ा इतका पुढे गेला की तो तिच्या ‘व्हॉट्सअप’वर पोर्न व्हिडिओ पाठवू लागला. या मुलीच्या तक्रारीवरून आणि तिने केलेल्या सहकार्यामुळे आम्हाला त्याला पकडण्यात यश आले, असे सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ उपनिरीक्षक नंदकिशोर मोरे यांनी सांगितले.
‘या दोन्ही प्रकरणांमध्ये मुलींची काहीच चूक नव्हती. पण, आमच्याकडे अशाही केसेस येतात की ज्या मुलींनीच आपली अश्लील छायाचित्रे वा व्हिडिओ आपल्या मित्रासोबत किंवा नवऱ्यासोबत ‘शेअर’ केलेले असतात. आणि मग त्यांचा पुढे विविध माध्यमांतून दुरूपयोग केला जातो. त्यामुळे, मुलींनी आपले असे व्हिडिओ किंवा छायाचित्रे कुणालाही पाठवू नयेत,’ असे आवाहन त्यांनी केले.
काय काळजी घ्याल
*व्यक्ती कितीही जवळची असली तरी तिच्यासोबतच्या ‘त्या’ क्षणांचे  चित्रिकरण करणे टाळा. केल्यास त्याचे शेअरिंग कुणासोबतही करू नका.
*ई-मेल, सेलफोन आदींचे पासवर्ड सतत बदलत ठेवा.
*आपली व्यक्तिगत माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणे टाळा
*तुमच्याविषयीची आक्षेपार्ह माहिती इंटरनेटवर दिसून आल्यास तातडीने पोलिसांचा सायबर सेल गाठा.
*तुमचा सेलफोन नंबर, ई-मेल पासवर्ड अनोळखी व्यक्तींशी शेअर करणे टाळा