कोकण रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवरील उपाहारगृहांचे पूर्णत: खासगीकरण करून लाहानग्या कॅन्टिनच्या जागी डॉमिनोज, पिझ्झा हट, मॅक-डी यांसारख्या बडय़ा उपाहारगृहांची साखळी उभारण्याचा प्रस्ताव कोकण रेल्वेच्या संचालक मंडळाने फेटाळून लावला आहे. या रेल्वे स्थानकांवरील बहुतांश उपाहारगृहे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना चालविण्यासाठी देण्यात आली आहेत. त्यामुळे पिझ्झा, बर्गरऐवजी कोकणात प्रवास करताना आंबापोळी, भाकरवडी, मिसळ हाच मेनू कायम राहील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तयाल यांनी वृत्तान्तला दिली.   
कोकण रेल्वे मार्गावर एका महिन्यात साधारपणे १२०० प्रवासी तसेच संपूर्ण वर्षभरात ५०० विशेष गाडय़ा धावतात. दिवसाला हे प्रमाण ५५ गाडय़ांचे आहे. त्यामुळे या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. एकीकडे दुहेरीकरण आणि मार्गाच्या विद्युतीकरणासाठी कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प आखले जात असताना कोकण रेल्वे मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांचे रूपडं पालटण्यासाठी एखादी योजना आखावी, अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. हिरव्या गर्द वनराई आणि दऱ्या-खोऱ्यांमधून रेल्वेचा प्रवास हे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे वैशिष्टय़ मानले जाते. निसर्गरम्य अशा या प्रवासाला तेवढय़ाच चटकदार जेवणाची संगत लाभावी, असा प्रयत्न कोकण रेल्वेने काही वर्षांपासून सुरूकेला आहे. मात्र, वेगवेगळ्या स्थानकांवरील उपाहारगृहांमधील खाद्यपदार्थाचा दर्जा फारसा समाधानकारक नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ यांसारख्या मोठय़ा स्थानकांवर दर्जेदार उपाहारगृहाची व्यवस्था करावी, अशा स्वरूपाची मागणीही जोर धरू लागली आहे. याच माध्यमातून या स्थानकांना काहीसा कॉर्पोरेट चेहरा द्यावा आणि मॅक-डी, पिझ्झा हट, डॉमिनोजची साखळी या ठिकाणी उभी केली जावी, अशी मागणी एका मोठय़ा गटाकडून सातत्याने केली जात आहे.
कोकण रेल्वेच्या संचालक मंडळाने मात्र हा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळून लावला असून कोणत्याही स्थानकावर अशा स्वरूपाची साखळी उभी केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. राज्यातील काही मोठय़ा द्रुतगती महामार्गालगत उभ्या करण्यात आलेल्या टोल प्लाझावर अशा स्वरूपाची उपाहारगृहांची साखळी उभी करण्यात आली आहे. तसेच मध्य, पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या काही स्थानकांवरही पिझ्झा हट, डॉमिनोजची दुकाने दिसू लागली आहे. भारतीय रेल्वेने अशा उपाहारगृहांची संकल्पना स्वीकारली असून भारतीय रेल्वेचा एक भाग असलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तिचा स्वीकार केला जावा, असा आग्रह धरला जात होता. मात्र, कोकण रेल्वेचा एकंदर बाज लक्षात घेता हे परदेशी खाद्यपदार्थाचे अनुकरण या मार्गावरील रेल्वे स्थानकांवर केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संचालक मंडळाने घेतली आहे. कोकण रेल्वेची उभारणी करताना प्रकल्पबाधित झालेल्या अनेक कुटुंबांना स्थानकावरील उपाहारगृह भाडेपट्टय़ावर देण्यात आली आहेत. प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेच्या प्रकल्पात सामावून घेतले जावे, हा या मागचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे सर्व प्रमुख स्थानकांमध्ये कोकणातील व्यक्तींमार्फत ही उपाहारगृहे चालवली जात आहेत. त्यामध्ये बदल केला जाणार नाही, अशी माहिती  तयाल यांनी वृत्तान्तला दिली.