हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी मुंबई, गोवा व भूज (गुजरात) येथे लवकरच डॉप्लर रडार यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती नसíगक आपत्ती निवारण व व्यवस्थापन चर्चासत्रात देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादला ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
प्रादेशिक हवामानशात्र केंद्र, मुंबई व राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागाच्या वतीने हवामान व संबंधित नैसर्गिक आपत्ती निवारण व व्यवस्थापन चर्चासत्र मराठवाडा कृषी विद्यापीठात घेण्यात आले. भारतीय हवामानशात्र केंद्राचे उपमहासंचालक एन. वाय. आपटे, वैज्ञानिक के. एस. होसाळीकर, व्ही. के. राजीव आदी उपस्थित होते. देशात सध्या १२ ठिकाणी डॉप्लर यंत्रणा बसविली असून, पहिल्या टप्प्यात मुंबई, गोवा, गुजरात यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे डॉप्लर यंत्रणा बसविली जाईल. पूर्वी हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठी रडार यंत्राचा वापर केला जात असे. सध्या डॉप्लर यंत्रणेचा वापर केला जातो. ही यंत्रणा २४ तास चालणारी असून डिजीटल स्वरूपाची आहे. यंत्रणेच्या कार्यकक्षेत ५०० किलोमीटर परिघातील परिसर येतो. तथापि २५० ते ३०० किलोमीटर परिघातील अंदाज परिणामकारक ठरू शकतात. मराठवाडय़ातील हवामानाच्या अंदाजासाठी नागपूर व हैदराबाद येथील डॉप्लर यंत्रणेची मदत घेतली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
राज्यात ३३८ पर्जन्यमापक केंद्रे असून मराठवाडय़ात ५५ केंद्रे आहेत. जलविज्ञान प्रकल्पांतर्गत यंत्रे बसविण्यात आली. मात्र, त्यांची योग्य ती देखभाल झाली नाही. त्यामुळे पावसाच्या नोंदी अचूक मिळण्यास अडचण येते. साधारणपणे ५७५ वर्ग किलोमीटर क्षेत्रात एक पर्जन्यमापक केंद्र असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या विजेबाबत पूर्वसूचना देणारी कोणतीही यंत्रणा सध्या विकसित नसून वीज कोसळण्याच्या दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी जनजागरण व खबरदारी हाच उपाय महत्त्वाचा असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजेय चौधरी यांनी प्रास्ताविक केले. होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ. संजय टाकळकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक डॉ. जे. बी. देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. सी. कुडमुलवार, विभागीय समन्वयक किशोर कुरे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी अशोक जाजू यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.