विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या रामगिरी प्रवेशद्वाराजवळ शेकडो अंगणवाडी सेविकांनी  गनिमीकावा पद्धतीने निदर्शने करून जवळपास ४५ मिनिटे मुख्यमंत्र्यांना देवगिरीच्या बाहेर पडू दिले नाही. या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी आणि निवृत्ती वेतन लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी व गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेतर्फे १८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला त्यावेळी संबंधित विभागाच्या मंत्र्याकडून कुठलेही आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचे अंगणवाडी सेविकांनी निश्चित केले होते मात्र त्यांना मुख्यमंत्र्याची वेळ मिळाली नाही. आज सकाळी आठच्या सुमारास रामगिरी परिसरात आजूबाजूला पोलिसांचा कडक बंदोबस्त असताना वेगवेगळ्या मार्गाने एक एक करीत शेकडो अंगणवाडी सेविका फलक घेऊन रामगिरीच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झाल्या आणि त्यांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. घोषणा सुरू होताच प्रवेशद्वाजवळ असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सकाळी ८.३० वाजता रामगिरीतून बाहेर पडणार होते. त्यामुळे पोलीस अधिकारी अंगणवाडी सेविकांची समजूत घालत त्यांना प्रवेशद्वारासमोरून उठण्याची विनंती करीत होते मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जायचे नाही, असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला. एकीकडे अंगणवाडी सेविका सरकारविरोधात घोषणा देत असताना मुख्यमंत्र्याचा ताफा बाहेर निघण्यासाठी सज्ज होता.
अधिवेशनाचा शेवटच्या दिवस असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सकाळी ९ वाजता सभागृहात पोहोचायचे होते. आकस्मिक आंदोलनामुळे त्यांना उशीर झाला.  अखेर मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाला आत बोलावून त्यांचे निवेदन स्वीकारले आणि संबंधित मागण्यांवर लवकरच चर्चा करून त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यावर सर्व सेविकांनी आंदोलन मागे घेतले. परिणामी ८.३० वाजता निघणारा मुख्यमंत्र्याचा गाडय़ांचा ताफा ९ वाजून २० मिनिटांनी रामगिरीतून बाहेर पडला.
मुख्यमंत्री रामगिरीतून बाहेर पडण्याच्या अर्धा तास आधी मार्गावरील सुरक्षा यंत्रणा सज्ज असताना आणि त्या भागात पोलिसांचे अभेद्य सुरक्षा कवच असताना या अंगणवाडी सेविका राामगिरीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्याच कशा? अशी चर्चा परिसरात होती.