गोदावरी खो-यातील लाभधारक शेतक-यांना यंदा शेतीची सहा आवर्तने देण्याची घोषणा जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केली असली तरी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र बोरावके यांनी याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात बोरावके यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही मंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर जनता आता विश्वास ठेवायला तयार नाही. कुठलाही गंभीर प्रश्न जरी उपस्थित केला तरी केवळ तेवढय़ापुरती वेळ मारून नेण्यापलीकडे त्या घोषणेला कुठलाही आधार नसतो. गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासंदर्भात दरवर्षी घोषणा केली जाते, पण त्यासाठी निधी दिला जात नाही. अनेक घोषणा सरकारला पूर्ण करता आलेल्या नाहीत.
दुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांची चेष्टा या सरकारने करू नये. नजरेत भरावे असे कोणतेही काम या सरकारने केलेले नाही. तेव्हा गोदावरी खो-यातील शेतक-यांना सहा आवर्तने देण्याची घोषणा तटकरे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांपुढे केली. त्यावर किती विश्वास ठेवायचा. वैतरणेचे पाण्याचे गेट १ वर्षांत बसवून पाणी देऊ अशी घोषणा झाली. मुळात शासनाकडे हा प्रस्ताव आला आहे का, त्याला शासनाने मंजुरी दिली आहे का, निधीची तरतूद आहे का, कशाच्या आधारावर ही घोषणा केली, असे एक ना अनेक प्रश्न बोरावके यांनी उपस्थित केले आहेत.