जिल्हा सहकारी बँक तीन वर्षांत भ्रष्टाचार, गैरव्यवहार व राज्य गुप्तचर विभागाकडून होणाऱ्या चौकशीमुळे राज्यभर गाजली. परंतु तेव्हा आरोप करणारे व सर्व संबंधित संशयित यांच्यातील संबंधात आता कमालीची सुधारणा झाल्याने बँकेतील गैरव्यवहार कितपत बाहेर येईल, याविषयी सभासदांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रणित गटाने बाजी मारली होती. राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य ईश्वरलाल जैन यांच्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व शिवसेना आमदार सुरेश जैन गटाचा दारूण पराभव झाला होता. निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्याने आघाडीचे नेतृत्व करणारे ईश्वरलाल जैन यांच्याकडे पहिल्या वर्षी अध्यक्षपद आले. दुसऱ्या वर्षीही स्वपक्षातीलच काही असंतुष्टांच्या नाराजीने पण सर्वसंमतीने जैन यांच्याकडेच अध्यक्षपद कायम राहिले. मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी संगणक खरेदीच्या मुद्यावरून जैन यांना धारेवर धरले होते. प्रचंड वादावादी केली. त्यानंतर माजी मंत्री सतीश पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी पाटील प्रयत्नशील असताना जैन यांनीच त्यांच्या नावाला जाहीरपणे विरोध केला. त्या वादात माजी खासदार अॅड. वसंत मोरे यांचा अध्यक्षपदी नंबर लागला.
बँकेत जैन आणि डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील संगणक खरेदी किंवा बँकेचे संगणकीकरण, शेतकरी वीमा, वसंत साखर कारखाना व यावल सूत गिरणी विक्री निविदा प्रकरण, तसेच अमळनेर येथील खुल्या भूखंडाचे मूल्यांकन यातील गैरव्यवहार चर्चेत आले. जैन व पाटील यांच्यावर आरोप झाले. बँकेतील विरोधी गटाचे संचालक शिवसेना आमदार चिमणराव पाटील हे आरोप करण्यात आघाडीवर होते. सत्ताधारी गटातील काही सदस्यांचा त्यांना उघडपणे पाठिंबा होता. आ. चिमणराव पाटील यांनी बँकेतील गैरव्यवहार संबंधी थेट सरकारकडे चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार शासनाकडून गुप्तचर विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले गेले.
अलीकडे झालेल्या बँकेच्या पंचवार्षिकमधील शेवटच्या अध्यक्षपद निवडणुकीत सत्ताधारी गटाचे तत्कालीन नेते खा. ईश्वरलाल जैन यांनी राष्ट्रवादीच्याच काही संचालकांसह शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांना पाठिंबा दिला व निवडूनही आणले. जैन व डॉ. सतीश पाटील यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहारांवर आवाज उठविणारे चिमणराव पाटील जैन यांच्याच सहकार्याने बँकेचे अध्यक्ष झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या जळगाव बँकेत शिवसेनेचा संचालक अध्यक्ष झाला. सहकारात राजकीय पक्षाचे जोडे आम्ही बाहेरच काढून ठेवतो. येथे पक्षीय राजकारण चालत नाही, असे गुळमळीत उत्तर ईश्वरलाल जैन याबाबत देतात. बँकेच्या गैरव्यवहारावर आवाज उठविणारे आ. पाटील आता अध्यक्ष झाले आहेत. अशा स्थितीत आता गैरव्यवहार कसा बाहेर येणार, हा प्रश्न विचारला जात आहे.