भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी सोलापुरात भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणूक सोहळ्यावर प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत डॉल्बी व डीजेंवर बंदी असताना डॉ. बाबासाहेबांवरील उत्कट प्रेमापोटी काही मंडळांनी कायद्याकडे दुर्लक्ष करून डॉल्बी व डीजेंचा वापर करून प्रचंड आवाजाचा दणदणाट केला. लेझर शोचे आकर्षण ठरलेल्या या मिरवणूक सोहळ्यात सुमारे दीड लाखाचा आंबेडकरी जनसमुदाय सहभागी झाला होता.                                                                            डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाला सोलापुरातील परंपरा वैशिष्टयपूर्ण आहे. डॉ. आंबेडकर हे हयात असतानासुध्दा त्यांच्यावर असीम प्रेम करणाऱ्या आंबेडकरी समाजाने त्यांची जयंती साजरी केली होती. १९३२ सालापासून जयंतीची परंपरा आहे. गेल्या रविवारी १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाला प्रारंभ झाला होता. शहरात ठिकठिकाणी मिळून ३२१ सार्वजनिक मंडळांनी डॉ. आंबेडकर मूर्ती तथा प्रतिमांची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या आठवडाभरात विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले. विशेषत: दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. तर काही मंडळांनी आपल्या खर्चात कपात करून टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले. तीन ठिकाणी बौध्दिक व्याख्यानमाला झाल्या. या तिन्ही व्याख्यानमालांना बुध्दिजीवी मंडळींकडून उत्तम प्रतिसाद लाभला. जयंतीच्या पाश्र्वभूमीवर शहरात जवळपास सर्व रस्ते व प्रमुख लहान-मोठय़ा चौकांमध्ये डिजिटल फलकांनी अभूतपूर्व अशी गर्दी केली होती. डिजिटल फलकांची गर्दी हा चर्चेचा विषय झाला होता.                                                                    रविवारी दुपारी पार्क चौकातून (डॉ. आंबेडकर चौक) भव्य मिरवणुकीला दुपारी प्रारंभ झाला. रणरणत्या उन्हात सुरू झालेल्या या मिरवणुकीचा प्रारंभ महापौर अलका राठोड व पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष धर्मेद्र चंदनशिवे, कार्याध्यक्ष अजित गायकवाड, रिपाइं नेते राजा सरवदे, के. डी. कांबळे, राजा इंगळे, बसपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संजीव सदाफुले, सुबोध वाघमोडे आदींची उपस्थिती होती. मिरवणुकीच्या अग्रभागी सोलापूर महापालिका आरोग्य विभाग कर्मचारी मंडळ होते. यंदा प्रथमच मिरवणुकीच्या सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जी. एम. मागासवर्गीय संस्थेने हा उपक्रम हाती घेतला होता. हेलिकॉप्टरमधून मिरवणूक सोहळ्यावर पुष्पवृष्टी होत असताना तेथील उत्साह द्विगुणीत झाला. न्यू बुधवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात उद्यानातील डॉ. बाबासाहेबांचा पुतळा, मिलिंद नगरातील डॉ. बाबासाहेबांचे अस्थिविहार, तसेच पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चार हुतात्मा पुतळे, पार्क चौकातील डॉ. बाबासाहेबांचा पुतळा, भैया चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, सुपर मार्केटमधील महात्मा फुले पुतळा तसेच संपूर्ण मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. महापौर अलका राठोड, महापालिका सभागृहनेते महेश कोठे व जीएम संस्थेचे प्रमुख बाळासाहेब वाघमारे यांनी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली.                               या मिरवणुकीत ५६ सार्वजनिक मंडळांचा सहभाग होता. बुध्ददर्शन मंडळाने डॉ. बाबासाहेबांच्या जन्मभूमी स्थळातील स्मारकाचा सुंदर देखावा सादर केला होता, तर प्रबुध्द भारत मंडळाने ‘लेझर शो’ सादर करून लक्ष वेधले. थोरमा मंगळवेढा तालीम मंडळ, सिध्दार्थ लेझीम संघ, मिलिंदनगर मंडळ, रमापती मंडळ, दीपक निकाळजे मित्र मंडळ यासह इतर अनेक मंडळांनी मिरवणुकीत उत्साह निर्माण केला. काही मंडळांनी डॉल्बी व डीजेचा वापर करून आवाजाचा दणदणाट केला. मागील दोन वर्षे तत्कालीन पोलीस आयुक्त  हिंमतराव देशभ्रतार यांच्या कार्यकाळात कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे एकाही उत्सवात डॉल्बी किंवा डीजेला स्थान नव्हते. या मिरवणुकीत नवी दिल्ली व नागपूर येथून खास मागविण्यात आलेल्या डीजेमुळे मिरवणुकीत तरुणाईमध्ये वेगळाच जोष पाहावयास मिळाला. सोबत लेझर शो तसेच पाईपमधून अग्नीच्या ज्वाळा काढून चित्तवेधक शक्तिप्रयोग सादर करण्यात आले. डॉल्बी, डीजे यांच्या दणदणाटात अबालवृध्दांकडून दिल्या जाणाऱ्या ‘जय भीम बोलो’ च्या घोषणा विरत होत्या.                                                                                      या मिरवणुकीने पार्क चौकमार्गे जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, फॉरेस्ट, महापौर बंगला, रेल्वे स्थानक, भैया चौक, मेकॅनिक चौकाकडे रात्री मार्गक्रमण केले होते. मिरवणुकीची सांगता मध्य रात्री बारा वाजता बुधवार पेठेतील पंचांची चावडी येथे करण्यात आली. या मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी अनेक संस्था व संघटनांनी पाणपोईची व्यवस्था केली होती. मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. यात ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक आयुक्त, २२ पोलीस निरीक्षक, ४३ सहायक निरीक्षक तथा फौजदार, ७७२ पोलीस कर्मचारी, ५० महिला पोलीस कर्मचारी, १८० गृहरक्षक जवान, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी याप्रमाणे पोलीस बंदोबस्त होता. दंगल नियंत्रण वाहनेही तैनात होती. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता ही मिरवणूक शांततेने पार पडल्याचे सांगण्यात आले.