स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत का, याची माहिती मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करणाऱ्या चंद्रकांत भंडारे या आंबेडकरी अनुयायास केवळ सरकारी उदासीनतेचा अनुभव येत आहे. माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या या प्रश्नाची अनेक खात्यांत टोलवाटोलवी सुरू असून केंद्रीय गृहविभागाने गेल्या काही दिवसांपासून चक्क मौन पाळले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांना राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता आहे की नाही, या बाबतचा संभ्रम कोण दूर करणार, असा सवाल भंडारे यांनी केला आहे.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ५६ वा महापरिनिर्वाण दिन येऊन ठेपला आहे. पण बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न अद्याप टांगणीवरच आहे. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत का, असा प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली आपण २३ फेब्रुवारी २०११ च्या पत्राद्वारे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केला होता, परंतु हा विषय आमच्या खात्याच्या अंतर्गत येत नाही, असे सांगून त्यांनी हात वर केले. त्यानंतर अनेक खात्यांकडून असाच अनुभव येत असल्याची खंत गेली काही वर्षे या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते भंडारे यांनी व्यक्त केली.
 डॉ. आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत का, त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे का? या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी आपण २५ एप्रिल २०१२ ला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभा, नगरविकास, गृह आणि सामाजिक न्याय इत्यादी विभागांकडेही पत्रव्यवहार केला. हा विषय केंद्रीय गृहविभागाचा असल्याचे सर्व खात्यांच्या सचिवांमार्फत आपल्याला कळविण्यात आले, परंतु ठोस उत्तर कुठल्याही खात्याकडून मिळत नसल्याने संबधित खात्यांना आपण वारंवार स्मरणपत्रेही पाठविली. गेल्या वर्षभरापासून गृह विभागाकडून तर कुठल्याही प्रकारचे उत्तरच आलेले नाही. डॉ. आंबेडकर हे राष्ट्रपुरुष होते की नाहीत, याचा  अद्याप केंद्र सरकारकडून शोध सुरू आहे का , असा सवालही भंडारे यांनी केला आहे.
जागतिक पातळीवरही पहिल्या दहा महापुरुषांच्या यादीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना स्थान देऊन गौरविण्यात आले आहे. असे असताना आंबेडकर हे राष्ट्रपुरूष आहेत की नाहीत? याबाबत शासनातील विविध विभागांकडून टोलवाटोलवीची उत्तरे का मिळत आहेत आणि त्यासंदर्भातील खुलासा का करण्यात येत नाही, असा प्रश्न भंडारे यांना पडला आहे.