संशोधन कौशल्य विकसित करण्यासाठी शालेय जीवनापासून कशी तयारी करता येईल.. संशोधनातील अडथळे कसे दूर होऊ शकतात.. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता यंत्रमानवाचा (रोबोट) वापर कितपत लाभदायी ठरू शकतो.. पेटंट म्हणजे काय, मुक्त स्वरुपात ती का दिली जात नाहीत.. वैज्ञानिक दृष्टिकोन व वैज्ञानिक मानसिकता रुजविण्यासाठी काय करायला हवे.. मातृभाषेत शिक्षण आवश्यक आहे का.. अशा विविध प्रश्नांचे समाधान ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व पत्नी गणित तज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांच्याकडून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी करवून घेतले. निमित्त होते, मराठी विज्ञान परिषदेच्या नाशिक विभागातर्फे गुरुवारी येथे आयोजित तासभर वैज्ञानिक गप्पाष्टक या कार्यक्रमाचे. डॉ. नारळीकर यांनी बालमनास पडलेल्या प्रश्नांची साध्या सोप्या शब्दात उत्तरे देऊन त्यांची जिज्ञासा शमविण्याचा प्रयत्न केला. मराठी विज्ञान परिषदेच्या नवरचना महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध शाळेतील शेकडो विद्यार्थी, विज्ञान शिक्षक व पालकही उपस्थित होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष धनंजय अहिरे व अजित टक्के यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळांकडून आधीच प्रश्न संकलीत करण्यात आले होते. त्यांचे समाधान डॉ. नारळीकरांनी केले. संशोधक बनण्यासाठी आधी कुठल्या शाखेत काम करण्याची आपणास गती व मती आहे, कित्येक तास काम करूनही कंटाळा येत नाही हे पहायला हवे. देशात संशोधनासाठी कृषी, औषध आदी क्षेत्रात संधी आहेत. मूलभूत संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. सध्या संशोधनाला मिळणारा निधी दुप्पट करण्याचा विचार सुरू असला तरी ही बाब अद्याप प्रत्यक्षात आली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संशोधनात निष्कर्ष महत्वाचे ठरतात. त्यांचे पेंटट घेतले जाते. ही प्रक्रिया किचकट असल्याने काही संशोधक पेटंट घेण्याचे टाळतात. जे ते घेतात, त्यांना त्याचे लाभ मिळतात. एखादा शोध लावण्यासाठी बराच वेळ व पैसा खर्ची पडतो. जनसामान्यांना उपयोगी ठरणाऱ्या अशा संशोधनातून कारखानदार मोठे उत्पन्न कमावितो. मग, ज्या संशोधकाने हे संशोधन केले आहे, त्याला बुध्दिमत्तेतील गुंतवणुकीचा मोबदला का मिळू नये, असा प्रश्न डॉ. मंगला यांनी उपस्थित केला. शाळेत विज्ञान विषय शिकविताना काय बदल करणे अपेक्षित आहे, याबद्दल बोलताना डॉ. नारळीकरांनी आपल्याकडे सर्व काही आलबेल असल्यासारखी स्थिती नाही असे स्पष्ट केले. संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण, तेथे काम करणाऱ्यांची मानसिकता नोकरशहांसारखी आहे. तरुणांकडून येणाऱ्या नवीन कल्पनांना पाठिंबा दिला पाहिजे. पाश्चात्य देशात तसे घडते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी प्रथम पालक व शिक्षकांनी आपल्या स्वत:मध्ये तो दृष्टीकोन आहे की नाही, याचे आत्मपरिक्षण करावे. कारण, त्यांच्यात त्यांची वैज्ञानिक मानसिकता नसल्यास विद्यार्थ्यांना वा पाल्यांना तशी दृष्टी लाभू शकणार नाही. मुलांना पडलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. दैनंदिन जिवनात विज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांचा निदर्शनास आणून द्या, असा सल्ला डॉ. नारळीकर यांनी दिला.
सध्या पालकांची पाल्यांना इंग्रजीतून शिक्षण देण्याची मनोधारणा झाली आहे. पण, पाल्यास आपण शाळेत नेमके कशासाठी पाठवितो त्याचा विचार केला जात नाही. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत घेतल्यास विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होऊ शकतो. सर्व विषय मातृभाषेतून त्यांना सहजपणे समजू शकतात. दरम्यानच्या काळात त्यांना इंग्रजीचे शिक्षण देता येते, असे डॉ. मंगला यांनी सांगितले.