18 January 2019

News Flash

डॉ. नभा काकडे यांचे ग्रंथ समाजाला प्रेरणा देतील- डॉ. धांडगे

डॉ. नभा काकडे यांनी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचे कार्य आपल्या ग्रंथातून चित्रित केले आहे. त्यामुळे त्यांचे ग्रंथ समाजातील स्त्रियांना प्रेरणा देतील, असा विश्वास डॉ. मीरा धांडगे

| May 6, 2013 12:10 pm

देशात महिलांवर अत्याचार होत असताना स्त्री शक्ती दुर्बल होत असल्याची अनुभूती येत आहे. अशा वेळी डॉ. नभा काकडे यांनी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचे कार्य आपल्या ग्रंथातून चित्रित केले आहे. त्यामुळे त्यांचे ग्रंथ समाजातील स्त्रियांना प्रेरणा देतील, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. मीरा धांडगे यांनी व्यक्त केला.
डॉ. नभा काकडे यांनी ‘बुधभूषणम्-एक चिकित्सा’, ‘संघर्षकन्या’ व ‘बुद्धकन्या’ हे तीन ग्रंथ लिहिले असून या तिन्ही ग्रंथांचा प्रकाशन सोहळा डॉ. मीरा धांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सेवासदन प्रशालेतील सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार हे होते. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल, डॉ. श्रीकांत येळेगावकर आदी उपस्थित होते.
डॉ. मीरा धांडगे म्हणाल्या, स्त्रियांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रेरणादायी आधाराची गरज आहे म्हणून डॉ. नभा काकडे यांनी राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, उषा डांगे, भंवरी देवी, सारा जोन्स, ताराबाई शिंदे अशा कर्तबगार स्त्रियांनी केलेल्या संघर्षांची कहाणी आपल्या ‘संघर्षकन्या’ या कथासंग्रहातून मांडली आहे. ‘बुद्धकन्या’ या त्यांच्या एकांकिकेचे खास मूल्य म्हणजे प्रयोगशीलता हे तत्त्व आहे. बुद्धकालीन कात्यायनी, प्रजापती, विमला, आम्रपाली, ऋषिदासी या स्त्रियांनी स्वत:चे स्वत्व सांभाळून आपल्या व्यक्तिरेखांतून आत्मिक आदर्श घालून दिला आहे. म्हणून समाजातील सर्वानी या ग्रंथांचे वाचन करावे, अशी अपेक्षा डॉ. धांडगे यांनी व्यक्त केली.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, बुधभूषणम् हा ग्रंथ छत्रपती संभाजीराजांनी लिहिला असून तो संस्कृत भाषेत आहे. राजनीतीवरील या ग्रंथाचा चिकित्सक अभ्यास डॉ. नभा काकडे यांनी केला आहे. त्यांनी छत्रपती संभाजीराजांची अस्सल पत्रे, राजमुद्रा, हस्ताक्षर, दानपत्रे यांचा समावेश ग्रंथामध्ये केल्याने त्याची उंची वाढली आहे. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मालदार यांनी डॉ. काकडे यांचे तिन्ही ग्रंथ साहित्यिक व सामाजिक मूल्य समाजाला दिशा देणारे ठरल्याचा अभिप्राय नोंदविला. यावेळी प्राचार्य डॉ. दलाल, डॉ. येळेगावकर यांचीही भाषणे झाली.
मेघा काकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

First Published on May 6, 2013 12:10 pm

Web Title: dr kakdes books motivated the womens in community dr dhandge