09 March 2021

News Flash

लोकसभेसाठी राजेंद्र मिरगणे यांची साखरपेरणी

डॉ. पद्मसिंह पाटील राजकारणातून निवृत्ती घेणार? गेल्या साडेतीन दशकांपासून जिल्ह्य़ाचे नेतृत्व करीत असलेले खासदार डॉ. पद्मसिंह पाटील आता राष्ट्रीय राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे

| May 8, 2013 02:43 am

डॉ. पद्मसिंह पाटील राजकारणातून निवृत्ती घेणार?
गेल्या साडेतीन दशकांपासून जिल्ह्य़ाचे नेतृत्व करीत असलेले खासदार डॉ. पद्मसिंह पाटील आता राष्ट्रीय राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. पाटील यांच्याऐवजी बार्शीतील उद्योजक राजेंद्र मिरगणे यांनी जोरदार साखरपेरणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच तयारीनिशी मैदानात उतरलो असल्याच्या वृत्ताला मिरगणे यांनीही दुजोरा दिला.
जिल्ह्याच्या राजकारणावर खासदार डॉ. पाटील यांची निर्विवाद पकड राहिली. मात्र, मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत ही पकड प्रभावी राहू शकली नाही. सलग ३० वर्षे ताब्यात असलेला उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ पाटील यांना राखता आला नाही. पहिल्यांदाच जनमत आजमावत असलेले माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादकरांनी नाकारले आणि राष्ट्रवादीचा गड राजेिनबाळकरांच्या माध्यमातून शिवसेनेकडे गेला. लोकसभा निवडणुकीस जेमतेम वर्ष बाकी आहे. उस्मानाबादचे जावई उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक व निकटवर्तीय बार्शीतील उद्योजक राजेंद्र मिरगणे यांनी लोकसभेची तयारी वेगात सुरू केली आहे. आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास पूर्णपणे तयार असून, संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मिरगणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार असतील, तर विद्यमान खासदार डॉ. पाटील यांच्यासाठी पक्षाने काय विचार केला आहे, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पवन राजेिनबाळकर यांच्या हत्येप्रकरणी डॉ. पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व सोडण्याची नामुष्कीही ओढवली होती. राष्ट्रवादीने मिरगणे यांच्या गळ्यात खासदारकीच्या उमेदवारीची माळ टाकली, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या डॉ. पाटील यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मागील तीन महिन्यांपासून मिरगणे यांनी खासदारकीसाठी जिल्ह्यात साखरपेरणी सुरू केली आहे. काही ठिकाणी स्वखर्चातून रस्ते बांधून दिले, तर काही ठिकाणी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर सुरू केले. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात राजेंद्र मिरगणे मित्रमंडळाचा टँकर फिरताना दिसत आहे. किल्लारीपर्यंत मिरगणे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोहोचले आहेत.
आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या मिरगणे यांनी स्वत:ची यंत्रणा चौफेर कामाला लावली असली, तरी राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी वा कार्यकर्ते त्यांच्यासोबत अजिबात नाहीत. डॉ. पाटील यांना नाकारून राष्ट्रवादीने मिरगणे यांच्यावर विश्वास दाखविल्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नेते-पदाधिकारी मिरगणे यांना कितपत सहकार्य करतील, हा संशोधनाचाच भाग आहे. असे असले, तरी राष्ट्रवादीची यंत्रणा सोबत न घेता मिरगणे यांनी लोकसभा निवडणुकीची सुरू केलेली खुलेआम तयारी डॉ. पाटील सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार काय, या चर्चेला पुष्टी देणारी ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2013 2:43 am

Web Title: dr padma singh patil takeing retirement from politics
टॅग : News,Politics
Next Stories
1 नांदेड होरपळले, पारा ४५ अंशांवर
2 नांदेडातील १३७ प्राथमिक शाळांची मान्यता अखेर रद्द
3 गेवराईत पंडित काका-पुतण्याच्या गटात अस्वस्थता
Just Now!
X