जयंती, दीपाली, दसरा आणि अकोला बहार ही माणसांची नावे नसून अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फळभाज्यांच्या बियाण्यांची नावे असून विद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांनी विकसित केलेल्या या पिकांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून विशेष मागणी आहे.
उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. श्याम घावडे आणि सहकाऱ्यांनी या नवीन जाती विकसित केल्या आहेत. वाल, भेंडी, कांदा, मिरची यांच्या नवीन जाती विकसित करून कृषी विद्यापीठाने या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ केली आहे. वालाची ‘दसरा’ आणि ‘दीपाली’ ही दोन वाणे आहेत. कांद्याची ‘सफेद कांदा’ आणि भेंडीचे ‘अकोला बहार’ तर ‘जयंती’ ही मिरचीची जात आहे. जाती विकसित करताना त्यांचे रंग, झाडांची वाढ, फुलांचा रंग आणि भरघोस उत्पादन आदींचा प्राधान्याने विचार केला गेला आहे. विकसित केलेल्या जाती केवळ कागदोपत्री न राहता त्याचे बियाणे विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून लक्षात येते.
उपलब्ध आकडेवारीनुसार मिरचीच्या ‘जयंती’ बियाण्यांची विक्री सोडल्यास वाल, कांदा आणि भेंडीच्या बियाण्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. २०१२मध्ये मिरचीच्या बियाण्यांची ४७.५० किलो बियाण्यांची विक्री झाली तर २०१३मध्ये ३५ किलो आणि २०१४मध्ये ती खाली येऊन २२ किलोने विक्री झाली. वालाच्या दसरा आणि दीपाली अशा दोन जाती विकसित केल्या असून दसरा या वाणाच्या २०१२मध्ये ५० किलो विक्री झाली. २०१३मध्ये ६२ किलो तर २०१४मध्ये दुप्पट १४० किलो विक्री झाली. ‘दीपाली’ या वाणाची २०१२मध्ये बियाणे विक्री ५२ किलो होती ती २०१३मध्ये ५८ किलो तर २०१४मध्ये १६० किलो झाली. कांद्याचे अकोला सफेद हे वाण २०१२मध्ये १२७ किलो विकले गेले. २०१३मध्ये ३२० किलो आणि २०१४ मध्ये ३४० किलोंची बियाणे विक्री झाली. ‘अकोला बहार’ या जातीचे बियाणे २०१२मध्ये केवळ ३० किलो विकले गेले. २०१३मध्ये ५५ किलो आणि २०१४मध्ये १२० किलो विकले गेले.
यासंदर्भात प्राध्यापक डॉ. वीरेंद्र गोंगे म्हणाले, विद्यापीठाने विकसित केलेली ‘जयंती’ हायब्रीड नसून मिरचीचे हायब्रिड बियाणे खासगी कंपन्यांनी बाजारात आणले आहे. ते बियाणे जास्त उत्पन्न देत असल्याने साहजिकच शेतकऱ्यांमध्ये जयंती कमी लोकप्रिय आहे. पांढरा कांदा विदर्भात मोठय़ा प्रमाणात होतो. कांद्यात अद्याप हायब्रिड बियाणे नाही. आपल्याकडील कांद्याची साठवणूक जास्त काळपर्यंत करता येते. नाशिकहून येणाऱ्या लाल कांद्याची साठवणूक जास्त काळ होऊ शकत नाही. भेंडीत काही कंपन्यांचे हायब्रीड बियाणे आले आहे. तरी विद्यापीठाने विकसित केलेल्या भेंडीचा आकार आणि कोवळेपणामुळे तिला मागणी चांगली आहे. प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेला वाल पूर्व विदर्भात प्रसिद्ध असून याचीही शेतकऱ्यांमध्ये चांगली मागणी आहे. एकूण मिरची सोडल्यास बाकी इतर विकसित जातींच्या बियाण्यांना चांगली मागणी आहे.