जिल्ह्य़ातील ‘सर्च’ या संस्थेच्या संस्थापक सहसंचालिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. राणी बंग यांना  मुंबई ऑब्स्टेट्रीक आणि गायनॉकॉलॉजिकल सोसायटीव्दारा डॉ. बी.एन. पुरंदरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. राणी बंग यांची प्रकृती ठीक नसल्याने स्वत: पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या जाऊ शकल्या नाहीत. डॉ.राणी बंग यांच्या वतीने ‘सर्च’ संस्थेशी निगडीत असलेल्या डॉ. तरू जिंदाल या मुंबई येथील स्त्रीरोगतज्ज्ञांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई ऑब्स्टेट्रीक आणि गायनॉकॉलॉजिकल सोसायटीव्दारा १९९१ पासून स्त्रीरोग व प्रसूतीक्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी डॉ. बी.एन. पुरंदरे यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या विषयात जागतिक प्रसिध्दी लाभलेले व या विषयातील भीष्म पितामह, असे डॉ. बी.एन. पुरंदरे यांना संबोधले जाते. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार अतिशय गौरवशाली असून यावेळी डॉ. राणी बंग यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. भारतातील मुंबई ऑब्स्टेट्रीक आणि गायनॉकॉलॉजिकल सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष होते. फेडरेशन आफॅ ऑब्स्टेट्रीक आणि गायनॉकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचेही ते अध्यक्ष होते, तसेच १९७२ मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॉकॉलॉजिकल अँड ऑब्स्टेट्रीकचेही ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. डॉ. राणी बंग गेल्या २७ वर्षांंपासून गडचिरोली जिल्ह्य़ातील दुर्गम भागात सेवा देत आहेत. स्त्रीरोग व प्रसूती आरोग्यसेवा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून मुख्यत: ग्रामीण स्त्रियांच्या विविध आजारांवर संशोधन, दवाखान्यात राहून, तसेच प्रत्यक्ष आदिवासी दुर्गम गावात जाऊन आरोग्य मेळाव्याव्दारा सेवा व संशोधन त्यांनी केले. त्यांनी केलेल्या या संशोधनामुळे जगभरात स्त्रियांच्या आरोग्याकडे लक्ष वेधले गेले व ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ८० व ९० च्या दशकात डॉ. राणी बंग या स्त्री आरोग्यनीतीच्या जागतिक पातळीवरील प्रवक्त्या होत्या. त्यांचे हे विशेष योगदान व कार्याबद्दल त्यांना हा सन्मान दिला गेला आहे.