यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय संचालकपदी डॉ. एस. एस.चौगुले यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी १ जानेवारी रोजी कार्यभार स्वीकारला. मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेत प्राध्यापक आणि संचालकपदाचा कार्यभार त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळला आहे.
 चौगुले यांनी शिक्षणशास्त्र विषयातून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे. त्यांना शैक्षणिक व प्रशासकीय कामाचा ४० वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित असून, त्यातील पाच पुस्तके विद्यापीठ पातळीवरील शिक्षणक्रमास लागू केली आहेत. तर १० पुस्तके समंत्रक प्रशिक्षणासंदर्भातील आहेत. तसेच त्यांनी तीन पुस्तकांचे परीक्षणही केले आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २०हून अधिक शोधनिबंधही सादर केले आहेत. तसेच त्यांचे ‘आर्टिकल बेस डॉट कॉम’ या वेबसाईटवर २५ संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत.
‘ऑल इंडिया असोसिएशन फॉर एज्युकेशनल रीसर्च’ या संस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणून २००८ पासून काम पाहात आहेत. तसेच ‘इंडियन डिस्टंन्स एज्युकेशन असोसिएशन’ व ‘ग्लोबल एज्युकेशन रीसर्च असोसिएशनने’ स्थापन केलेल्या कलेक्टिव्ह विजडम ग्रुपचे ते सचिव म्हणून काम पाहात आहेत. यापूर्वी त्यांनी वारणा शिक्षण मंडळ, वारणानगर या शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले आहे.