परिवर्तनाचा संघर्ष हा केवळ आजचा नसून तो सनातन आहे आणि पुढेही तो कायमच राहणार आहे, एकदा झाले म्हणजे ते पुन्हा करावे लागत नाही, असे नाही तर प्रत्येकच काळात संघर्ष आणि संवाद ही परिवर्तनाचीच सामुग्री राहिली आहे. म्हणूनच चार्वाक, बुद्धापासून ते संताचे प्रबोधन, फुले, आंबेडकर, लोहिया यांच्यापर्यंत परिवर्तनाच्या लढय़ाला उज्ज्वल अशी परंपरा लाभली आहे. या दिशा परिवर्तनाच्या शक्यताच सांगतात व पुरोगाम्यांमध्येही प्रतिगामी आणि प्रतिगाम्यांमध्येही पुरोगामी असतात, अशा आशयाचे उद्गार विचारवंत, लेखक व समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लोहिया अध्ययन केंद्रात बोलताना काढले. लोहिया अध्ययन केंद्राच्या मधु लिमये सभागृहात केंद्रातर्फे आयोजित ‘परिवर्तनाच्या नव्या दिशा व शक्यता’ या विषायावरील त्यांच्या व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते.
विद्रोही कोणतीही जात, धर्म, पक्ष वा विचार करत नसून माणसाचे माणूसपण हिरावून घेणाऱ्या कृतींविरुद्ध उभी होण्याची ती वृत्ती असते आणि ती प्रत्येकच काळातील मानवी शोषणाच्या सनातन वृत्तीच्या विरोधात उभी असते. परिवर्तनाची तीच ऊर्जा असते, आपण फक्त शोषणाच्या बाजूने उभे राहायचे की शोषणाविरुद्धच्या परिवर्तनाच्या वृत्तीच्या बाजूने ते आपण ठरवायचे, मात्र आपण ते ठरवले नाही म्हणून परिवर्तन व्हायचे थांबणार नाही. यानंतरच्या परिवर्तनाच्या दिशा व शक्यता विकासाच्या नावाखाली ज्यांचे सारे हिरावून घेतले जात आहे तेच ठरवणार आहेत. कारण ते ठरवण्याची सुरुवात मध्यमवर्गाची इच्छा व सामथ्र्य कधीच संपुष्टात आले असून तो परिवर्तनाच्या समर्थनाऐवजी जे जसे आहे ते तसेच चालवून घेण्याच्या बाजूने झुकला आहे. हा समाज व हा देश मुळातच परिवर्तनाच्या अव्याहत सुरू असलेल्या संघर्षांमुळेच परस्परसंवादी व सहिष्णू झालेला असल्याने त्याला विसंवादी व असहिष्णू करण्याचे काहीच कारण नाही, असेही डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले. प्रास्ताविक हरीश अडय़ाळकर यांनी केले.