डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया करून नांदिवली नाला, भोपरमार्गे कल्याण खाडीत सोडले जाते. याच भागातील काही सांडपाणी सावित्रीबाई फुले रंगमंदिराजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून कांचनगाव नाल्यामार्गे खाडीत सोडले जाते. असे असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाने उल्हास नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांमध्ये डोंबिवली औद्योगिक परिसरातील कंपन्यांना नोटिसा बजाविल्याने खळबळ उडाली आहे.
डोंबिवली परिसरातील अनेक कंपन्या गेल्या ४० दिवसांपासून बंद आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईमुळे उद्योजक हैराण आहेत. वनशक्ती संस्थेने उल्हास नदी परिसरातील प्रदूषणाबाबत पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादासमोर याचिका दाखल केली आहे. लवादाच्या आदेशावरून उल्हास नदी प्रदूषण करणाऱ्या उल्हासनगर, अंबरनाथ भागातील काही कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई केली आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून सोडण्यात येणारे सांडपाणी गांधीनगर, नांदिवली, भोपर नाल्यामार्गे कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांमधील नाल्यामधून कल्याण खाडीला मिळते. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिर परिसरात असलेल्या कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया करून कांचनगाव, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील नाल्यामधून कल्याण खाडीत सोडण्यात येते. असे असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याणच्या अधिकाऱ्यांनी डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांना उल्हास नदी प्रदूषणाच्या कायदेशीर प्रक्रियेत का गोवले, असे प्रश्न उद्योजकांमधील एका मोठय़ा गटाकडून उपस्थित केले जात आहेत.  ४० कंपन्यांपैकी २० कापड उद्योग प्रदूषण करीत नसल्याचा ‘साक्षात्कार’ आता मंडळाला झाला आहे. प्रदूषण करीत असल्याचे निष्कर्ष काढत उर्वरित २० रासायनिक उद्योग सुरू करण्याच्या मन:स्थितीत मंडळाचे अधिकारी नाहीत.