निर्माते उपेंद्र दाते यांच्या ‘रंगमंच, मुंबई’ या नाटय़संस्थेचा ४० वा वर्धापनदिन नुकताच साहित्य संघ मंदिरात ज्येष्ठ अभिनेते आणि नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे आणि साहित्य संघाच्या उषा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. ‘रंगमंच’ संस्थेने गेल्या ४० वर्षांत ३२ नाटकांची निर्मिती करून त्यांचे २७५५ प्रयोग सादर केले आहेत. या आनंद सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर, सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे, उद्योजक उदयदादा लाड, शशांक पाटील यांना केशव स्मृती कृतज्ञतापत्र आणि स्मरणचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे रंगमंच व रंगनील निर्मित ‘प्रपोजल’ या सध्या रंगभूमी गाजवत असलेल्या आणि पुरस्कारांचा वर्षांव झालेल्या नाटकातील कलावंत व तंत्रज्ञांनाही यावेळी गौरविण्यात आले. याप्रसंगी ‘रंगमंच, मुंबई’ संस्थेचा यथोचित गौरव करताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, ‘मराठी रंगभूमीवर तीन प्रकारच्या नाटय़संस्था आढळतात. हौशी, व्यावसायिक आणि धंदेवाईक. पैकी धंदेवाईक संस्था या केवळ फायद्यासाठीच काढलेल्या असल्याने जोवर फायदा होतो तोवर त्या चालविल्या जातात. पण तोटा होतोय हे लक्षात आल्यावर त्या सरळ बंद केल्या जातात. हौशी नाटय़संस्था नाटय़कलेवरील प्रेमापोटीच काढलेल्या असल्याने हौस भागली की त्या बंद होतात. त्यांचाही कालावधी दहा-बारा वर्षांचाच असतो. उपेंद्र दाते यांच्यासारखे कलाकार नाटकाशिवाय दुसरे काही करायचेच नाही असे ठरवून नाटय़संस्था सुरू करतात आणि मग नफ्या-तोटय़ाचा विचार न करता ती सुरू ठेवतात. ही खरी व्यावसायिक संस्था! अशी संस्थाच ४० वर्षांची प्रदीर्घ वाटचाल करू शकते आणि पुढेही करत राहील.’ निर्माते उपेंद्र दाते यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी बळ देणाऱ्या सर्वाबद्दल या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त केली. त्याचप्रमाणे संस्थेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन नाटय़संमेलनाप्रमाणे धुमधडाक्यात साजरा होईल असा विश्वासही प्रकट केला. जयश्री दाते यांनी अभिनेते रमेश भाटकर, पाध्ये पब्लिसिटीचे श्रीराम पाध्ये, अभिनेत्री नयना आपटे यांच्यासह उपस्थितांना तुळसीचे रोप व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. या सोहळ्यानंतर रंगमंच, मुंबई निर्मित ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकाचा प्रयोग नेहमीप्रमाणेच रंगला.
आज ‘एका अटीचा संसार’चा प्रयोग
इंदुरच्या ‘नाटय़भारती’ या संस्थेच्या ‘एका अटीचा संसार’ या राजन खान यांच्या कथेवर आधारीत नाटकाचा प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या सहकार्याने शुक्रवार, ७ जून रोजी रात्री ८ वा. गिरगावातील साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात सादर होणार आहे. ‘नाटय़भारती’ संस्थेने या वर्षी राज्य नाटय़स्पर्धेत अमरावती केंद्रावर सादर केलेले हे नाटक प्रथम आले होते. त्यानंतर अंतिम फेरीतही त्याला यश मिळाले. राजन खान यांच्या मूळ कथेचे नाटय़रूपांतर सतीश पाठक आणि श्रीराम जोग यांनी केले असून, दिग्दर्शनही श्रीराम जोग यांचेच आहे. या नाटकात श्रीराम जोग, अलका जोशी, अरुण खळे, लोकेश निमगावकर, जय हर्दिया आणि प्रतीक्षा बेलसरे हे कलावंत काम करीत आहेत.