20 September 2020

News Flash

मधल्या भिंती कनिष्ठ मध्यमवर्गीय जाणिवांचे चित्रण

‘मधल्या भिंती’.. विजय तेंडुलकरांचं १९५८ च्या सुमाराचं नाटक. नाटककार म्हणून तेंडुलकरांची घडण होत असतानाचं. साहजिकच पूर्वसुरींचा काहीसा प्रभाव आणि आपलं स्वतंत्र लेखनसत्व धुंडाळण्याची तेंडुलकरांची धडपड

| March 31, 2013 12:06 pm

‘मधल्या भिंती’.. विजय तेंडुलकरांचं १९५८ च्या सुमाराचं नाटक. नाटककार म्हणून तेंडुलकरांची घडण होत असतानाचं. साहजिकच पूर्वसुरींचा काहीसा प्रभाव आणि आपलं स्वतंत्र लेखनसत्व धुंडाळण्याची तेंडुलकरांची धडपड या नाटकात दिसून येते. तेंडुलकरांच्या विविधांगी नाटय़-प्रवासातलं हे थोडंसं डावं असलेलं नाटक. त्यामुळे असेल बहुधा; त्याचे फारसे प्रयोग झाले नाहीत. तेंडुलकरांच्या महत्त्वाच्या नाटकांमध्ये समावेश नसल्यानंही तसं घडलं असावं. अलीकडेच ‘आविष्कार’तर्फे ते रंगभूमीवर आलं आहे. विश्वास सोहोनी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे.
साठच्या दशकातील मुंबईमधील चाळसंस्कृतीत वास्तव्य करणाऱ्या एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबाचं चित्रण या नाटकात तेंडुलकरांनी केलेलं आहे. परिस्थितीच्या रेटय़ानं मेटाकुटीस आलेलं हे कुटुंब. नाना, त्यांची पत्नी पार्वती, थोरला मुलगा सदा, मधला प्रभाकर आणि धाकटा दत्ता अशा पाचजणांचं हे कुटुंब. नाना रिटायर्ड. तरीही ते महिन्याची तोंडमिळवणी करण्यासाठी प्रूफं तपासायचं काम घरबसल्या करीत. मुलांपैकी सदा नुकताच नोकरीस लागलेला. त्याच्या तुटपुंज्या पगारात कसाबसा घरसंसार चाललेला. मधला प्रभाकर फारसं शिक्षण न झाल्याने इकडे-तिकडे नोकरीसाठी वणवणतोय. पण कुठंच काही जमत नाहीए. धाकटा दत्ता अद्यापि शाळेत जाणारा. त्यानं तरी चांगलं शिक्षण घ्यावं, अशी सदाची इच्छा. सदाचा मध्यंतरीच्या काळात प्रेमभंग झाल्यानं त्याची आयुष्यावरची वासना उडालेली. पार्वतीनं कसंबसं त्याला ताळ्यावर आणलेलं. आता त्याच्या लग्नाचं बघायला हवं, असं पार्वतीच्या मनानं घेतलेलं. ‘तू सांगशील त्या मुलीशी मी आता लग्न करीन,’ असं प्रेमभंगानं पोळलेल्या सदानं तिला वचन दिलेलं. त्यामुळे ती खुशीत असते. आपल्या घराला गरिबीच्या खातेऱ्यातून बाहेर काढू शकेल, अशी श्रीमंताघरची; पण सद्गुणी शालन तिनं सदासाठी पाहून ठेवलीय. शालन सुशिक्षित, सुसंस्कृत. तिचं सदाच्या घरी येणं-जाणं असल्यानं सुशील सदाच्या एकतर्फी प्रेमात पडलेली. या घरातली आपुलकी, प्रेम, आत्मीयता आई-वडिलांविना वाढलेल्या शालनला हवीहवीशी वाटे. पार्वतीच्या पसंतीस उतरल्यानं हे घर आता आपलंच होणार, या जाणिवेनं ती चांगलीच मोहरलेली.
त्यानुसार रीतसर नवऱ्या मुलीला- म्हणजे शालनला दाखवायचा कार्यक्रम पार्वतीनं त्या दिवशी ठेवलेला. पण सदा पार्वतीच्या या इच्छेवर पाणी फिरवितो. आपण मंदा नावाच्या रूपानं सुमार, गरीब; परंतु आपल्या घराला घरपण देऊ शकेल अशा मुलीशी लग्न करणार असल्याचं तो जाहीर करतो आणि घरात एकच भूकंप होतो. पार्वतीला ही आपली मानहानी वाटते. जो मुलगा आपल्या शब्दाबाहेर नाही, असं तिला वाटत असतं आणि ज्यानं तिला तसं वचनही दिलेलं असतं त्या सदानंच आपल्याला तोंडघशी पाडलं, याचा जबर धक्का तिला बसतो. ती त्याच्याशी याउप्पर आपला काहीही संबंध नाही, त्यानं हे घर सोडून जावं, असं कठोरपणे त्याला फर्मावते. नाना, प्रभाकर आणि दत्ता तिला समजवायचा खूप प्रयत्न करतात, पण ती कुणाचंच ऐकत नाही. शेवटी नाइलाजानं सदा घर सोडतो.
लग्नाला बोलावूनही पार्वतीच्या हेकेखोरपणामुळे घरातलं कुणीही सदा-मंदाच्या लग्नाला जात नाहीत. लग्न लागल्यावर सदा बायकोसह आई-नानांचे आशीर्वाद घ्यायला येतो, पण तरीही पार्वती त्याला माफ करीत नाही. उलट त्याला ‘आलास तसा चालता हो’ म्हणून सांगते. सदा परोपरीनं तिला विनवितो. इतरही पार्वतीला झालं गेलं विसरून त्यांना आशीर्वाद द्यायला सांगतात. तितक्यात तिथं आलेली शालनही पार्वतीची समजूत घालायचा प्रयत्न करते. सदा तिच्या या मानभावी वागण्याबद्दल शालनवर उखडतो. शालन शक्य तितक्या समजूतदारपणे सदाचा गैरसमज दूर करू पाहते, पण तो काहीएक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो. तिच्यामुळेच हे सारं घडलंय, हे तो जाणून असतो. या सगळ्या प्रकारानं मंदा भलतीच अवघडून जाते. काय करावं तिला सुचत नाही. शेवटी निरुपायानं सदा तिला ‘आपण इथून निघू या’ म्हणून सांगतो, पण मंदा त्यास ठाम नकार देते. ‘हे घर माझं आहे. माझ्या माणसांचं आहे. मी ते सोडून दुसरीकडे कुठंही येणार नाही,’ असं ती निर्धारानं सदाला सांगते.
मंदानं घर सोडलं नाही तरी पार्वतीच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही. ती मंदाचा न बोलून मानसिक छळ आरंभते. तरीही मंदा त्यांचं आणि घरातल्या सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी मनापासून राब राब राबते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायचा प्रयत्न करते. कधी ना कधी तरी सासूबाईंना उपरती होऊन त्या आपल्याला आपलं म्हणतील अशी चिवट आशा तिला वाटत असते, पण दिवस उलटतात तरीही पार्वतीची अढी जात नाही. या कोंडमाऱ्याने मंदा हळूहळू शारीरिक-मानसिकदृष्टय़ा खचत जाते. सदा परोपरीनं तिला समजवायचा प्रयत्न करतो. तोच तर एकमेव आधार असतो तिला त्या घरात! पण त्याचाही धीर सुटत चाललेला असतो. आपण दोघं या घरासाठी, त्यातल्या माणसांसाठी मर-मर मरूनही आईला त्याची कदर नाही, हे दु:ख त्याला पोखरत राहतं. मंदा अधूनमधून त्याच्या या वेदनांवर फुंकर घालीत असली तरी तिची अवस्था पाहून त्याचा जीव आणखीनच तुटतो.
घरातला हा कलह असह्य़ होऊन नाना जातात. तरीही पार्वतीचं कठोर मन द्रवत नाही.
..आणि एके दिवशी मंदाला एक चिठ्ठी सापडते. सदाला आलेली! ती वाचल्यावर धरती दुभंगून पोटात घेईल तर बरं, असं मंदाला वाटतं. ज्या नवऱ्याच्या आशेवर ती या असह्य़ यमयातनांतून जात असते, तो नवराही आपला नाही, हे कळल्यानं ती पार कोलमडून पडते. आता या घरात एक क्षणही राहण्यात अर्थ नाही, हे ती समजून चुकते. सदाला त्याबद्दल जाब विचारला असता तर तो चक्क कानांवर हात ठेवतो. ‘कुणाची चिठ्ठी? कुणी लिहिली? आपल्याला काहीच माहीत नाही,’ असं तो मंदाला परोपरीनं सांगायचा प्रयत्न करतो, पण मंदाचा निर्णय झालेला असतो. ती आपले कपडे एका पिशवीत भरते आणि निघते.
इतक्यात देवळात गेलेली पार्वती घरी परतते. मंदाच्या हातातली कपडय़ांची पिशवी पाहून ती तिला ‘कुठं निघालीस?’ म्हणून विचारते. मंदा घडल्या प्रकारावर पांघरुण घालू बघते. मात्र पार्वतीच्या तीक्ष्ण नजरेनं सगळं टिपलेलं असतं. झाला प्रकार कळल्यावर ती सदाला घरातून चालतं व्हायला सांगते आणि मंदाला ‘तू कुठंही जायची गरज नाहीए. मी तुला पोसायला समर्थ आहे,’ असं ठणकावून सांगते.
एवढय़ात शालन येते. आणि..
‘मधल्या भिंती’मध्ये तेंडुलकरांनी माणसांच्या मनातल्या निरगाठी, अहम्, समज-गैरसमज, परिस्थितीवश आणि माणसाच्या पिंडप्रकृतीप्रमाणे निर्माण होणारे निरनिराळे गंड आणि त्यापायी त्यांच्यात तयार होणाऱ्या अदृश्य भिंतींचं चित्रण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे करीत असताना हाडामांसाची माणसं व त्यांचं वर्तन अधिकाधिक वास्तवाकडे, खरेपणाकडे नेण्याची धडपड त्यांनी यात केली आहे. त्यात ते बऱ्याच अंशी सफलही झाले आहेत. तत्पूर्वी, वास्तववादी म्हणवणारी नाटकंही कृत्रिम, खोटय़ा पद्धतीनं सादर होत. त्यातले संवाद अलंकारिक, पुस्तकी असत. बऱ्याचदा त्यातून लेखकच डोकावत असे. ‘मधल्या भिंती’मध्ये तेंडुलकरांनी हा कृत्रिमपणा काढून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसांचं जगणं, त्यांच्या परस्परसंबंधांतले ताणेबाणे, पेच, त्यांचं व्यक्त होणं, राग-लोभ हे सारं जास्तीत जास्त अकृत्रिम असण्यावर त्यांनी भर दिला आहे. अर्थात् तरीही पूर्वसुरींच्या अप्रत्यक्ष संस्कारांमुळे अधूनमधून उपमा, अलंकारिक वाक्यं यातही येतात, नाही असं नाही; पण ती टाळण्याचा प्रयत्नही सतत जाणवत राहतो. तेंडुलकरांची खासीयत असलेले मिताक्षरी संवाद, अर्थपूर्ण पॉझेस यात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण ते सर्वकाळ त्यांना जमलेलं नाही. मानवी नातेसंबंधांबद्दलचं, त्यातलं गूढ उकलण्याबद्दलचं त्यांचं आकर्षण या नाटकातही जाणवतं. खऱ्या अर्थानं ‘माणसा’ला भिडणारा नाटककार ही त्यांची पुढची ओळख इथंही प्रत्ययाला येते. शालनच्या अव्यक्ततेतून ती खूप काही व्यक्त करून जाते. तीच गोष्ट मंदाची! तिच्या सोशीकपणातही गहन अर्थ दडलेला आहे.
दिग्दर्शक विश्वास सोहोनी यांनी तेंडुलकरांचं हे काहीसं डावं नाटक करण्याचं धाडस दाखविलं आहे आणि त्यात ते पूर्णाशानं यशस्वी झाले आहेत. मूळ तीन अंकी नाटकातला पहिला अंक वगळून आणि संपूर्ण नाटक साक्षेपानं संपादित करून हा प्रयोग त्यांनी बसविला आहे. गाभ्याला धक्का न लावता! सर्व पात्रं त्यांच्या आत्म्यासह प्रयोगात अवतरतात. त्या प्रत्येकाचा स्वतंत्र विचार दिग्दर्शकानं केल्याचं जाणवतं. ही हाडामांसाची माणसं आहेत आणि ती तशीच अभिव्यक्त व्हायला हवीत, याचं भान त्यांनी राखलं आहे. नाटकातला अव्यक्त आशय अल्प तसंच दीर्घ विरामांतून, पात्रांच्या हालचाली, लकबी आणि नेत्रकटाक्षांतून व्यक्त करण्यात दिग्दर्शक सोहोनी यशस्वी झाले आहेत. साठच्या दशकातलं कनिष्ठ मध्यमवर्गीय, परिस्थितीशी झगडणारं, मूल्यं जपू पाहणारं कुटुंब, त्यांचं जगणं त्यांनी प्रत्ययकारीतेनं नाटकात मांडलं आहे. रवी-रसिक यांनी चाळीतलं दोन खणी घर त्यातल्या बारीकसारीक तपशिलांसह यथार्थपणे उभं केलं आहे. स्वप्ननील जयकर यांनी प्रकाशयोजनेतून प्रहरांचं सूचन आणि नाटय़ात्मक प्रसंगांतलं गहिरेपण ठळक केलं आहे. मयूरेश माडगावकरांनी पाश्र्वसंगीतातून नाटय़ांतर्गत मूड्स अधोरेखित केले आहेत.
संजीव पंडित यांनी नानांची कुचंबणा, त्यांचं थिटेपण तसंच आयुष्यातल्या टक्क्य़ा-टोणप्यांतून आलेलं शहाणपण नेमकेपणी व्यक्त केलं आहे. एका क्षणी पार्वतीचा स्फोट होतो आणि ती त्यांना त्यांनी केलेल्या चुकांची जाणीव करून देते त्यावेळचं त्यांचं कानकोंडेपण आणि सुनेला पार्वतीनं माणुसकीहीनतेचा कडेकोट करीत अव्हेरणं असह्य़ होऊन त्यांचं कोसळणं-बरंच काही सांगून जातं. वयाच्या १३व्या वर्षी लग्न होऊन त्या घरात आल्यापासून आपल्यावर झालेल्या अन्यायानं मनातल्या मनात कुढणारी, तरीही संसारातली सारी कर्तव्यं निमूटपणे पार पाडणारी पार्वती आपल्या अस्तित्वाचा शोध घेत राहते.
 सदाचं लग्न आपल्या पसंतीच्या मुलीशी करून देण्यानं तिच्या अस्तित्वाला अर्थ मिळणार असतो, पण तेही न घडल्यानं कमालीची दुखावली गेलेली आणि त्यामुळे सर्वाप्रती कडू जहर झालेली पार्वती-मानसी कुलकर्णी यांनी समर्थपणे उभी केली आहे आणि जेव्हा आपण ज्या अन्यायातून गेलो, तोच कित्ता सुनेच्या- मंदाच्या बाबतीतही पुनरुक्त होतोय हे पाहिल्यावर आपला गंड बाजूला सारून ती तिच्या पाठीशी कातळासारखी ठामपणे उभी राहते. हा संपूर्ण भावनिक-मानसिक प्रवास त्यांनी उत्कटतेनं दाखविला आहे. सुमार रूप असलेली, पण माणूसपणानं ओतप्रोत भरलेली मंदा-श्वेता घोडके यांनी अबोलपणेही खूप बोलकी केली आहे. सदाचं सर्वार्थानं पिचलेपण, त्रागा संकेत ओक यांनी अचूक पकडला आहे. अबोल प्रीतीतली शहाणीव, त्याग आणि समर्पणभाव शालन झालेल्या स्नेहा चव्हाण यांनी मोजक्याच प्रसंगांत लक्षवेधी केला आहे. बेकारी आणि घरातल्या घुसमटीनं आत्मविश्वास हरवून बसलेला प्रभाकर- समर्थ म्हात्रे यांनी खांदे पाडून चालण्या-वावरण्याच्या कृतीतून यथातथ्य साकारला आहे. रितेश साळवींचा भाबडा, निरागस दत्ताही विलोभनीय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 12:06 pm

Web Title: drama review madhlya bhinti
Next Stories
1 माणूसपण जपणारा राजकारणी!
2 विद्युत जमवाल म्हणे देणार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
3 द व्हिलेज.. चला गावाला..
Just Now!
X