महाविद्यालयीन आणि युवा रंगकर्मीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘कल्पना एक अविष्कार अनेक’ या एकांकिका स्पर्धेच्या नुकत्याच पार पडलेल्या अंतिम फेरीत चेतना महाविद्यालयाने बाजी मारली. या महाविद्यालयाने सादर केलेली ‘टिकटिक’ (अंतरंग थिएटर्स)  ही एकांकिका सवरेत्कृष्ट ठरली. सवरेत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य, अभिनय आदी पारितोषिकांवर ‘टिकटिक’ने मोहर उमटविली. या एकांकिकेचे लेखन विशाल कदम यांचे आहे.
या स्पर्धेत ‘एक निरंतर जुलूस’ (सिद्धार्थ महाविद्यालय-आनंद भवन, अविरत) ही एकांकिका दुसरी आली. स्पर्धेचे पुनरुज्जीवन झाल्यानंतरचे दहावे तर एकंदर २७ वे वर्ष होते. यंदाच्या स्पर्धेसाठी नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी ‘हे किरकोळ ते महत्वाचे’ असा विषय सुचविला होता. या एकाच विषयावर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पाच एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या.अंतिम फेरीसाठी परिक्षक म्हणून अशोक पाटोळे, जयंत पवार, डॉ. गिरीश ओक यांनी काम पाहिले. नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. पुढील वर्षी स्पर्धेसाठी नाटककार राजन खान यांनी ‘माणसं’ असा विषय सुचविला आहे. पुढील वर्षी प्राथमिक आणि अंतिम फेरी अनुक्रमे २१ आणि २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक-सुमित पवार (टिकटिक), सवरेत्कृष्ट लेखक- आशिष पाथरे( एक निरंतर जुलूस), प्रकाश योजनाकार-राजेश पंडित (टिकटिक), संगीत- रोहन पेडणेकर (टिकटिक), नेपथ्य-धनंजय पाटील (टिकटिक), अभिनय-प्रथम क्रमांक,केतन साळवी (टिकटिक), अभिनय-द्वितीय क्रमांक, रोहित मोरे (एक निरंतर जुलूस), अभिनय-तृतीय क्रमांक, संध्या माणिक (केस क्रमांक अमूकतमूक)