सुकन्या कुलकर्णी यांचे प्रतिपादन
सांस्कृतिक ठाणे
रसिकांनी जास्तीत जास्त नाटके पाहावीत त्यामुळे नाटय़सृष्टीची भरभराट होऊ शकेल. ‘प्रारंभ’च्या माध्यमातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळत असल्याने अशा उपक्रमांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी व्यक्त केले. प्रारंभ, युनियन बँक ऑफ इंडिया आणि पीतांबरी यांच्या सौजन्याने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये नुकताच महिला महोत्सव पार पडला. या कार्यक्रमास अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, अभिनेते उदय टिकेकर आणि दिग्दर्शक अभिजित पानसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रारंभ महिला महोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. १७ ते ७० वयोगटांतील महिलांनी या स्पर्धामध्ये भाग घेतला होता. या सर्वाना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रारंभच्या वतीने देण्यात येणारा सौदामिनी पुरस्कार सुनिता लिमये यांना प्रदान करण्यात आला. डोंबिवलीच्या महिलांनी ‘समिधा’ हा कार्यक्रम तर पुण्याच्या कुंदा प्रदान यांनी बहिणाबाईंच्या कवितांवर कार्यक्रम सादर केला. सर्व वयोगटांतील महिला प्रारंभच्या या उपक्रमात सहभागी होऊन आपले कलागुण दाखवतात. त्यामुळे हा उपक्रम विशेष आवडीचा असल्याचे मत प्रारंभाच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी यावेळी व्यक्त केले.
‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाचा वर्धपन दिन
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचा तृतीय वर्धापन दिन १६ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. त्यानिमित्ताने ठाण्यातील ९० वाचकांनी ग्रंथ दिंडी घेऊन नाशिक गाठले. संस्थेचा पहिला वर्धापन दिन ठाण्यातील सहयोग मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. तर दुसरा वर्धापन दिन काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तिसरा वर्धापन दिन कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्य समन्वयक विनायक रानडे ठाण्यात दाखल झाले होते. ठाणे ते कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकपर्यंतच्या प्रवासादरम्यान वाचकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मराठीतील साहित्यिकांच्या वैशिष्टय़ांवर व त्यांच्या ग्रंथसंपदेवर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली होती. अरविंद जोशी यांनी स्पर्धेचे संयोजन केले. नाशिकमध्ये ठाण्यातील वाचकांचे रांगोळ्यांच्या पायघडय़ांनी स्वागत करण्यात आले. निबंध स्पर्धा व प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना ग्रंथाली, मुंबईच्या वतीने पुस्तके देण्यात आली.