रंगभूमीवर मी काम करतो ते आत्मानंदासाठी. अर्थात प्रेक्षक हा रंगभूमीचा महत्त्वाचा घटक आहे. एवढेच नाही तर, प्रेक्षक हाच भगवान आहे. पण, माझ्या कामाविषयी मी समाधानी असणे हेच मला अधिक महत्त्वाचे वाटते. यामध्ये माझी भूमिका शबरीची आहे. मी स्वत: समाधानी असेल तरच रंगभूमीवर सादर करतो, अशा शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे (एनएसडी) अध्यक्ष रतन थिय्याम यांनी रंगभूमीविषयीचे जणू तत्त्वज्ञान उलगडले. ‘मैं ऑडियन्स को खट्टा नहीं मीठा फल देता हूँ’, असे त्यांनी सांगितले.
सरहद संस्थेतर्फे रतन थिय्याम यांना भुपेन हजारिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये आलेल्या थिय्याम यांनी पत्रकारांशी बोलताना विविध राज्यांमध्येही ‘एनएसडी’च्या शाखा म्हणजेच ‘रिपर्टरी’ असाव्यात ही भूमिका मांडली.  त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये अशी शाखा सुरू झाली आहे. बंगळुरू येथील शाखेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मदतीविना हे उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका आहे. असे सांगत सांस्कृतिक उन्नयनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून सांस्कृतिक बजेट जवळपास ‘शून्य’ आहे या वास्तवावर बोट ठेवले. यासाठी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. केवळ निवडणुका आणि सत्ता एवढय़ापुरतेच पाहणाऱ्या राजकारण्यांकडून सांस्कृतिक क्षेत्राची उपेक्षाच होणार, असे भाष्य त्यांनी केले.  
इतकी वर्षे रंगभूमीवर वावरल्यानंतर मला अजूनही ‘थिएटर’ समजलेले नाही. कुणी विचारले तर, मी ‘नाटक’ करतो, असेच सांगतो. अजूनही वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून रंगभूमी या सशक्त माध्यमाच्या सर्व शक्यता पडताळून पाहणारा मी एक विद्यार्थी आहे. असेच मला वाटते, अशी नम्रतापूर्वक भावना त्यांनी व्यक्त केली. ‘थिएटर इज लाईक लॅबोरेटरी’ हा मुद्दा स्पष्ट करताना, रंगभूूमी ही विविध कल्पना आणि संकल्पनांद्वारे सतत प्रयोग करण्याची प्रयोगशाळा असल्याचे त्यांनी नमूद केले. रंगभूमी हे काही प्रेक्षकांना शिकविण्याचे, मार्गदर्शन करण्याचे किंवा उपदेश करण्याचे प्रबोधनाचे माध्यम नाही. तर, रंगभूमी हे नट आणि प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारे व्यासपीठ असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
महाराष्ट्र आणि बंगाल या दोन प्रांतांमध्ये इंग्रजांचे वास्तव्य होते. त्यामुळे या दोन राज्यांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव होत असताना रंगभूमी या माध्यमाचा उपयोग करून घेण्यात आला आहे. या दोन राज्यांमध्ये नाटकाचा स्वत:चा असा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला आहे. म्हणूनच अन्य प्रांतांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आणि बंगाल येथील प्रादेशिक रंगभूमी सशक्त असल्याचे दिसते, असे रतन थिय्याम यांनी सांगितले.