महावितरणमध्ये केलेल्या तक्रारीबाबत चौकशीत जबाब नोंदविण्यास बोलविण्यात आलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार ग्रामपंचायतीचा कर्मचारी शेख बाहोद्दीन (वय ४२) यांनी जबाब देण्याआधीच विषारी औषध प्राशन केले. या प्रकाराने खळबळ उडाली. शेख यांना अत्यवस्थ अवस्थेत परभणीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शेख यांनी जवळाबाजार येथील महावितरणच्या अनधिकृत कामाविषयी महावितरणच्या नांदेड कार्यालयात दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. तक्रारीची चौकशी करण्यास महावितरणचे कार्यकारी अभियंता बी. पी. पानढवळे व अभियंता ठाकूर शनिवारी जवळाबाजार येथे गेले व तक्रारदार शेख बाहोद्दीनला जबाब नोंदविण्यास येण्याचे कळविले. दुपारी दीडच्या सुमारास तक्रारदार शेख बाहोद्दीन याने जबाब नोंदविण्यापूर्वीच विष प्राशन केले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी परभणी रुग्णालयात दाखल केले. विषप्राशन करण्याचे कारण समजू शकले नाही.