उरण तालुक्यातील द्रोणागिरी महोत्सवाची सुरुवात येत्या सोमवारपासून होत आहे. या महोत्सवाचे यंदाचे १४ वे वर्ष असून महोत्सवात जिल्हास्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा महोत्सव २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत उरण नगरपालिकेच्या वीर सावरकर मैदानात भरविण्यात येणार आहे. द्रोणागिरी महोत्सवात दरवर्षी दोन हजारांपेक्षा अधिक स्पर्धक सहभाग घेतात. द्रोणागिरी महोत्सवात विद्यार्थी, युवक, महिला तसेच खुल्या गटातील विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. यामध्ये पुरुषांकरिता जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा, महिलांसाठी शाब्बास सुनबाई, मेहंदी, रांगोळी स्पर्धा त्याचप्रमाणे वेशभूषा, हस्ताक्षर, वक्तृत्व, किक बॉिक्सग, अंडरआर्म क्रिकेट, अभिनय, टी-शर्ट पेंटिंग स्पर्धा, कराटे, शरीरसौष्ठव, लंगडी, लगोरी, खो-खो आदींचेही आयोजन केले आहे. द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविलेल्यांना द्रोणागिरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याची माहिती द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत यांनी दिली आहे.