15 January 2021

News Flash

ऐन भरात येऊनही ‘केळीचे सुकले बाग’..

विदर्भाला दुष्काळाच्या झळा मराठवाडय़ाची जनता तीव्र दुष्काळाच्या झळा सोसत असतानाच विदर्भालाही दुष्काळाचा तडाखा बसला असून बुलढाणा जिल्ह्य़ात पाण्याअभावी केळीच्या बागा उद्ध्वस्त होत असून शेतकरी हवालदिल झाला

| April 26, 2013 03:47 am

विदर्भाला दुष्काळाच्या झळा
मराठवाडय़ाची जनता तीव्र दुष्काळाच्या झळा सोसत असतानाच विदर्भालाही दुष्काळाचा तडाखा बसला असून बुलढाणा जिल्ह्य़ात पाण्याअभावी केळीच्या बागा उद्ध्वस्त होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक वाळत असल्यामुळे शेतक ऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धामनगाव बढे परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी महागडय़ा बेण्यांची खरेदी करून केळीची लागवड केली. कसेबसे वर्षभर पाणी देऊन त्याला मोठे केले. पीक ऐन भरात येत असतानाच धरणासह विहिरीत पाणी नसल्यामुळे बागा उद्ध्वस्त होत आहेत.
गेल्या वर्षी मार्च व एप्रिल महिन्यात शहरातील सोपान बढे, अशोक हिवाळे, रफिक रज्जाक, आरीफ रज्जाक, अर्जुन बोरसे, दामोधर कानडजे, मदिनाबी शेख गुलाब, शालीग्राम घोंगडे व विनोद वैराळकर यांच्यासह अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन ते चार एकरावर महागडय़ा बेण्यांची खरेदी करून केळीची लागवड केली. केळीला पाणी देऊन त्यांची वर्षभर मशागत केली. गेल्या वर्षभरात मशागतीवर या शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक लाखाहून अधिक खर्च केले. परंतु केळीचे पीक ऐन भरात येत असतानाच पाणी कमी पडले. यापैकी अनेक शेतकऱ्यांनी तर लाखो रुपये खर्च करून कापूसवाडी धरणावरून पाईपलाईन टाकली होती. परंतु यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे कापूसवाडी धरण शेवटच्या घटका मोजत आहे.
दिवसागणिक भूगर्भातील जलपातळी खोल जात आहे. नदी, नाले, विहिरी व प्रकल्प कोरडे पडले आहेत. सर्वत्र भीषण पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून प्रशासनाने प्रकल्पातील जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून अधिकाऱ्यांनी धरणावरील शेतकऱ्यांचे वीजपंप काढून घेतल्यामुळे पाण्याअभावी केळीचे पीक जगवणे शेतकऱ्यांसाठी अशक्यप्राय होऊन बसले आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाणी नसल्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत.
ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त केळीच्या बागांचा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सरपंच भागवत दराखे व पंचायत समिती सदस्य रामदास चौथनकर यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 3:47 am

Web Title: drought in banana farm because of water shortage
टॅग Farming
Next Stories
1 एमपीएससी आणि विद्यापीठ परीक्षा एकाच दिवशी
2 राष्ट्रपतींच्या दौऱ्यात बदलाने पोलीस, प्रशासनाची धावपळ
3 एलबीटीची झळ जाणवू लागली;चिल्लर विक्रेत्यांना मालाची चणचण
Just Now!
X