तालुक्यातील आसोदा गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २०१२ वर्षांचे मदतीचे धनादेश जिल्हा बँकेकडून अद्याप मिळाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल मंडळाने यासंदर्भात जिल्हा बँक अध्यक्षांकडे निवेदन दिले आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तीन हजार रुपयांची मदत देण्यात आली. तहसीलदारांकडून मदतीचे धनादेश संबंधित बँकांकडे पाठविण्यात आले. इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी या धनादेशांचे वितरणही वेळेत केले. जिल्हा बँकेच्या खातेदारांना मात्र या मदतीचे धनादेश अद्याप वितरित करण्यात आले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुष्काळी मदतीचे वाटप तत्काळ म्हणजे दोन दिवसांत सुरू करावे, अन्यथा बँक अध्यक्षांच्या दालनातच शेतकरी पूर्वसूचना न देता ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. आधी निवेदन दिल्याप्रमाणे ५० हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची नोंद शेतीच्या सातबारा उताऱ्यावर करू नये, पीक कर्जाच्या रकमेत चारपट वाढ करावी, शेतकरी गटाच्या प्रकल्पांना अर्थसाहाय्य मंजूर करावे, तसेच ग्रामीण गोदाम योजना व हरितगृह उभारणीसाठी लादलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. किशोर चौधरी, संजय चिरमाडे, संजय महाजन, महेश भोळे, आर. एस. सावदेकर, मनोज चौधरी, संजय ढाके आदींची निवेदनावर स्वाक्षरी आहे.