ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून भारताच्या शिरपेचात तुरा खोवणारा मुष्ठीयोद्धा विजेंद्र सिंग अंमलीपदार्थाच्या विळख्यात सापडल्यानंतर सेलिब्रेटी आणि अंमलीपदार्थाचे नाते पुन्हा एकदा उजेडात आले. बॉलिवूड असो की उच्चभ्रू मंडळी, सारेच अंमलीपदार्थाच्या विळख्यात गुरफटले आहेत. अंमलीपदार्थाची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र तस्करांकडून अवलंबण्यात येणाऱ्या विविध पद्धतीमुळे अंमलीपदार्थाची तस्करी रोखणे पोलिसांना अवघड होत आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी शाखेने २०१२ मध्ये तब्बल १४ कोटी ५१ लाख रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले होते. गेल्या १५ वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. बॉलिवूड आणि अंमली पदार्थाचे जुने नाते आहे. पार्टीमध्ये अंमलीपदार्थांचे सेवन करणे हा एक ट्रेण्ड बनला आहे.
अंमलीपदार्थ विरोधी पथकाने २०१२ मध्ये केलेली कारवाई ही सर्वात मोठी मानली जात आहे. परंतु तरीही ते केवळ हिमनगाचे टोक असल्याचे खुद्द अधिकारी मान्य करीत आहेत. विमातळावरुन होणारी तस्करी रोखण्यासाठी अधिकारी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. परंतु तस्कर अंमलीपदार्थाची तस्करीसाठी नवनवीन मार्गाचा अवलंब करीत आहेत.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अंमलीपदार्थाची तस्करी करण्यासाठी दलाल नवनवीन मार्गाचा वापर करीत आहेत. महिला आणि मुलांना सोबत घेऊन घरगुती सहल आल्याचे भासविण्यात येते. महिला आणि मुलांना पाहिल्यावर त्यांची विशेष तपासणी होत नाही आणि मग हे दलाल त्यांच्यामार्फत अंमलीपदार्थ हव्या त्या ठिकाणी पोहोचवतात.
रेव्ह पार्टी आणि पब्जमध्ये अंमलीपदार्थाचा वापर सर्रास होत असल्याची कबुली अंमली पदार्थविरोधी शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. सेलिब्रेटी आणि उच्चभ्रूंच्या पाटर्य़ामधील अंमलीपदार्थाचे रॅकेट भेदणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

अंमली पदार्थाच्या तस्करीचे मार्ग
*  कुणालाही संशय येऊ नये आणि तपासणीतून सहज सुटता यावे यासाठी गृहिणींचा वापर केला जात आहे.
*  उच्चशिक्षित, वयस्कर मंडळींचा अंमलीपदार्थाच्या तस्करीसाठी वापर केला जात आहे. अशा व्यक्तींकडे सहसा संशयाने पाहिले जात नाही. उदाहरण सांगायचेच झाले तर काही महिन्यांपर्वी विमानतळावर महिला प्राध्यापकाला अटक करण्यात आली होती.
*  कुरियरच्या सामानात दडवून अंमलीपदार्थाची तस्करी करणे सोपे असते.
*  वाहनांची स्टेपनी, सीट इत्यादी.
*  सफरचंदासाठी वापरले जाणाऱ्या पेटय़ा. या पेटय़ांच्या विशिष्ट रचनेमुळे त्यातून तस्करी करणे सोपे होते.

विमानतळावर आम्ही कडक तपासणी करीत असतो. परंतु महिलांचा तस्करीमध्ये सहभाग वाढला आहे. कुरियरच्या माध्यमातूनही अंमलीपदार्थाची तस्करी होत आहे.
समीर वानखेडे, पोलीस उपायुक्त,
हवाई गुप्तचर विभाग

बॉलिवूड आणि पेज थ्रीच्या लोकांनी उघड केलेले वास्तव
*  अंमलीपदार्थ घेतल्याने उर्जा मिळते आणि नाचण्यासाठी ते घ्यावे लागते
– साक्षी प्रधान, अभिनेत्री (बिग बॉस ४ मधील एक स्पर्धक)
* पेज थ्री पाटर्य़ामध्ये अंमलीपदार्थाचे सेवन करणे हा एक ट्रेण्ड बनला आहे आणि त्यामुळे पार्टीचा आनंदही घेता येतो
– सुबीर राणा (मॉडेल)
* बॉलिवूडमधील प्रंचड स्पर्धेमुळे मानसिक तणाव आणि नैराश्य येते. त्यामुळे अंमलीपदार्थाचे सेवन केले जाते.
– मनोज पांडे, भोजपुरी अभिनेता