समाजातील भावी पिढी म्हणून विद्यार्थी व अल्पवयीनांची गणना केली जात असून याच पिढीतील अनेकांना अगदी अल्पवयातच अमली पदार्थ तसेच नशेची लत लागू लागली आहे. त्याच्या जोडीला समाजातील अपप्रवृत्तींच्या विळख्यातही पिढी फसू लागली आहे. या अल्पवयीनांना भानावर आणण्यासाठी तसेच नशेपासून दूर सारण्यासाठी उरण तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन जनजागरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कोप्रोली येथील मराठी शाळेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उरण तालुक्यातील एका विद्यालयात शिक्षण घेणारे काही विद्यार्थी तेज बुद्धीसाठी विविध प्रकारच्या अमली पदार्थाच्या आहरी गेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे, असा दावा सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या पिढीला व्यसनाधीनतेपासून वेळीच रोखण्यासाठी उरण तालुक्यातील आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच सदस्य व गावागावांतील सामाजिक कार्यकर्ते यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संतोष पवार यांनी केले आहे. याच बैठकीत लग्नाच्या निमित्ताने गावोगावी तसेच शहरातील गल्लीबोळात परीक्षेच्या कालावधीत होणारे भव्य व दिमाखदार साखरपुडे, हळदी समारंभ तसेच रात्रभर विजेच्या लखलखाटात चालणारे लाखो रुपयांचे क्रिकेटचे सामने यांच्या भपकेपणावरही चर्चा करण्यात येणार आहे.

सध्या तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांवर वाईट व्यसनांचा प्रभाव लवकर पडत आहे. त्यामुळे वाईट व्यसनांचा प्रभाव पडणाऱ्या बाबींपासून त्यांना सावध केले पाहिजे. आपल्या मुलांबाबत पालक जागरूक राहिले तर अमली पदार्थाच्या विळख्यात शालेय विद्यार्थी व तरुण पिढी गुरफटणार नाही, असे मत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असतानाही समाजप्रबोधनाच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे, हे कौतुकास्पद असल्याचे वाघमारे म्हणाले. तर मुलांचा आईवडिलांशी असलेला संवाद आता हरवत चालला असून त्याऐवजी त्यांच्यात वाद वाढत चालला आहे. पालकांनी मुलांच्या दिनक्रमांकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच त्यांच्याशी मित्राप्रमाणे संवाद साधणे गरजेचे आहे. युवा पिढीला तंबाखूजन्य आणि अमली पदार्थाच्या सेवनापासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचे डॉ. अजित मगदूम म्हणाले. योग्य वयात योग्य ती समज न मिळाल्यामुळे अनेक जण व्यसनाधीन होतात. त्यामुळे अमली पदार्थाविरोधात जनजागृती करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुन्हे घडल्यानंतर तपास करण्यापेक्षा गुन्हेच होऊ नयेत म्हणून आमचा प्रयत्न असल्याचे मत गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केले.