* नाताळ, नववर्षांच्या पाटर्य़ांवर पोलिसांची नजर
* ३५ ठिकाणी पहारा
* ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडीत विशेष मोहिम
* पोलिसांनी केली जय्यत तयारी  
नाताळ तसेच नववर्ष स्वागताच्या पाटर्य़ा झोडून दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांविरोधात ठाणे पोलिसांनी विशेष मोहिम आखली आहे.  नाताळ ते नववर्ष या सहा दिवसांच्या कालावधीत ठाण्यापासून, कल्याण डोंबिवली, भिवंडीपर्यत तब्बल ३५ ठिकाणी पोलिसांचा जागता पहारा असणार आहे. तळीरामांना अद्दल घडविण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तयारी केली असून या सहा दिवसांसाठी श्वास विश्लेषक यंत्रांची मोठी आयात करण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्याअखेर नाताळ तसेच नववर्ष स्वागता पाटर्य़ाचे वेध लागतात. त्यासाठी शहरातील हॉटेल तसेच मोठ-मोठे हॉलचे नोंदणी महिनाभर आधीच करण्यास सुरूवात होते. ठाणे शहरातील येऊर भागात मोठय़ा प्रमाणात हॉटेल आणि बंगले असून तेथेही अशा प्रकारच्या पाटर्य़ा साजऱ्या करण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या पाटर्य़ा साजरे करण्याचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मासांहार तसेच मद्याचे मोठय़ा प्रमाणात सेवन केले जाते. नाताळ तसेच नववर्षांच्या पाटर्य़ा झोडल्यानंतर बुहतेक जण घरी परतण्यासाठी मद्याच्या नशेतच वाहन चालवितात. नशेत वाहनावरील ताबा सुटून तळीराम चालकांकडून अपघात होण्याची दाट शक्यता असते. तळीरामांकडून झालेल्या अपघातांचा अनुभव लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी नाताळ तसेच थर्टीफस्टच्या कालावधीत विशेष मोहिम हाती घेतली.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यासाठी या परिसरातील सुमारे ३० ते ३५ ठिकाणांची निवड केली आहे. तसेच या मोहिमेसाठी सुमारे आठ श्वास विश्लेषक यंत्राच्या साहय्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली. नाताळ तसेच नववर्ष स्वागतासाठी मद्याच्या पाटर्य़ाचे आयोजन करण्याच येते. मात्र, या पाटर्य़ानंतर घरी परतण्यासाठी मद्याच्या नशेत वाहन चालवून अपघातांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे ही मोहिम राबिवण्यात येत असल्याचे डॉ. परोपकारी यांनी स्पष्ट केले.