‘फोटोग्राफर्स अ‍ॅट पुणे’ या छायाचित्रकारांच्या गटातर्फे ‘दृष्टिकोन २०१२’ हे छायाचित्र प्रदर्शन शुक्रवारपासून (३० नोव्हेंबर) घोले रस्त्यावरील न्यू आर्ट गॅलरी येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे यंदा सहावे वर्ष असून यामध्ये ५५ छायाचित्रकारांच्या अमूर्त छायाचित्रण, निसर्गचित्रे, वन्य जीवन, समाजजीवन अशा विविध विषयांवरील ९५ छायाचित्रांचा समावेश आहे. १५ वर्षांच्या युवकापासून ते विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक या संस्थेचे सभासद आहेत. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या हस्ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दोन डिसेंबपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यक्ती त्यांना आवडलेले छायाचित्र स्वतच्या खासगी संग्रहासाठी विकत घेऊ शकतील. या विक्रीतून संकलित झालेल्या निधीतील ५० टक्के रक्कम विद्या प्रतिष्ठान संस्थेतील मूक-बधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणगी दिली जाणार आहे.