अकरावी प्रवेशासाठी सर्वच प्रमुख महाविद्यालयांत विविध शाखांसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांच्या तुलनेत दोन ते तीन पटींनी अर्जाची विक्री झाली असून अर्ज सादर करण्याचा बुधवार हा अखेरचा दिवस आहे. पुढील तीन दिवस अर्जाची छाननी झाल्यावर शनिवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. ‘गुणवत्तेच्या आधारे जाहीर होणाऱ्या यादीत आवडत्या महाविद्यालयात कोणाला प्रवेश मिळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गुणवत्ता आणि प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी विद्यार्थी व पालकांची अर्ज जमा करण्यासाठी धावपळ सुरू होती. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची १५ जूनपासुन सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया ८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात प्रवेश अर्ज प्रवेश अर्ज वितरण व जमा करण्याची अंतिम मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे. त्यानंतर २२ जूनपर्यंत या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता सर्व महाविद्यालयांमध्ये संवर्गनिहाय गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल.
आपल्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसा प्रवेश मिळाला नाही तर पुढील पर्याय म्हणून इतर काही महाविद्यालयांचे अर्ज भरून ठेवले आहेत. यामुळे बहुतांश महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांच्या तुलनेत दोन ते तीन पटींनी अर्जाची विक्री झाल्याचे दिसत आहे. त्यात केटीएचएम महाविद्यालयात आतापर्यंत तब्बल १४ हजार प्रवेश अर्जाची विक्री झाली आहे. त्या खालोखाल हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयात जवळपास पाच हजार अर्जाची विक्री झाली तर भि. कु. सा. महाविद्यालयात साडे तीन हजार, भोसला महाविद्यालय ७५०, एस. एम. आर. के महिला महाविद्यालय ८००, सिडको महाविद्यालय २५०० अर्ज वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यातील बहुतांश अर्ज महाविद्यालयांकडे जमा झाले असून उर्वरित अर्ज मुदत संपण्याच्या अखेरीस जमा होण्याचा अंदाज आहे. अर्ज विक्रीसाठी काही महाविद्यालयांनी ‘ऑनलाईन’ची व्यवस्था केल्यामुळे त्या ठिकाणी तुलनेत शांतता दिसत आहे.