27 January 2020

News Flash

औषधांमधील भेसळीमुळे आयुर्वेदावरील विश्वास उडण्याची तज्ज्ञांना भीती

आयुर्वेदिक औषधनिर्मितीमधील वनस्पतींचे योग्य संरक्षण व उत्पादन होत नसल्यामुळे आयुर्वेद औषधांमध्ये भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे.

| July 8, 2015 08:20 am

आयुर्वेदिक औषधनिर्मितीमधील वनस्पतींचे योग्य संरक्षण व उत्पादन होत नसल्यामुळे आयुर्वेद औषधांमध्ये भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे. ही भेसळ थांबली नाही, तर नागरिकांचा आयुर्वेदावरील विश्वास उडेल, अशी भीती आयुर्वेद तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

आयुर्वेदात २ हजार वनस्पतींचा उल्लेख असला तरी त्यातील फक्त १ हजार वनस्पतीच वापरल्या जातात. पन्नास वर्षांपूर्वी या वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. त्याची मागणी विदेशातही वाढली, परंतु या औषधी वनस्पतींच्या उत्पादनाकडे मात्र लक्ष देण्यात आले नाही. ९० ते ९५ टक्के वनस्पती जंगलात आहेत. त्यापैकी २५ ते ३० टक्के नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये हलक्या प्रतीच्या औषधांची भेसळ करण्यात येत आहे. ही औषधे मूळ गुणधर्म असलेल्या नावावर विकली जात आहेत. त्याची माहिती सर्वसामान्यांना नसते. ही भेसळ आयुर्वेद डॉक्टरही ओळखू शकत नाही. हे टाळण्यासाठी या औषधी वनस्पतींचे जंगलात संरक्षण आणि उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे मत येथील शासकीय आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक, तसेच लातूर येथील मांजरा आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दत्ता वंजारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. आयुर्वेद औषधांचे भौतिक आणि रासायनिक मानक निश्चित झाले पाहिजे. औषधींचा योग्य प्रकार आणि त्याची गुणवत्ता ही एक मोठी समस्या आहे. ‘असगंध’ आवश्यकतेनुसार बाजारात उपलब्ध आहे, परंतु सर्व असगंधाचे गुणधर्म एकसारखे नाहीत. नेपाळी आणि भारतीय ‘चिरायता’मध्ये खूप फरक आहे.

नेपाळी चिरायता अत्यंत गुणकारी आहे. औषधगुण असणाऱ्या वनस्पतींच्या यादीत नवीन वनस्पतींचा समावेश करण्यात आपल्याला अपयश आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

चरक संहितेत ‘सोम’चे वर्णन औषधीराजाच्या रूपात करण्यात आले आहे. अनेक आयुर्वेदिक ग्रंथात सोमचे वानस्पतिक वर्णन आणि गुणधर्माचा सविस्तर उल्लेख आहे, परंतु अजूनही आम्हाला सोमचा शोध लागलेला नाही. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडल्यानंतर लंकेचे वैद्यराज सुषेण यांनी संजीवनी बुटीद्वारे उपचार करून त्यांना जिवंत केले होते. या दुर्लभ औषधांचा शोध लावून आयुर्वेदाला पुन्हा उपचाराच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचता येऊ शकते.

याशिवाय, ब्रम्हसुवर्चला, सर्पा, श्रावणी, महाश्रावणी, आदित्यपर्णी, ब्रम्हदंडी, अशा अनेक दिव्य औषधांचा शोध लागला तर आयुर्वेद उपचार पद्धतीत नवीन क्रांती होऊ शकते, अशी आशाही डॉ. वंजारी यांनी व्यक्त केली.

 

पेटंटचा धोका

अ‍ॅलोपॅथी औषधांचे दुष्परिणाम होत असल्याने संपूर्ण जगच आता आयुर्वेदाकडे आकर्षित होत आहे. अमेरिकेकडून आपल्या गुणकारी औषध वनस्पतींच्या पेटंटचा धोका आहे. त्यामुळे भारतातील आयुर्वेदतज्ज्ञांनी औषध वनस्पतींची गुणधर्मासह संपूर्ण माहिती भारतीय औषधशास्त्र केंद्रीय परिषदेला देणे आवश्यक आहे. अमेरिका जेव्हा एखाद्या वनस्पतीबद्दल पेटेंटचा दावा करेल, तेव्हा ही वनस्पती मूळ आमची असून त्यावर यापूर्वीच आम्ही संशोधन केल्याचे पुराव्यासह स्पष्ट केले पाहिजे. भारतातील अनेक औषध वनस्पतींवर अमेरिका पेटंटचा दावा करू शकतो, अशी भीती येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील रसशास्त्र  विषयाचे प्रा.डॉ. आर.एम. खियानी यांनी व्यक्त केली.

 

अ‍ॅलोपॅथी औषधांचीही भेसळ

आयुर्वेद औषधांमध्ये अ‍ॅलोपॅथी औषधांची भेसळ होत असल्याचे केंद्र सरकारच्या औषधविज्ञान संस्था व संशोधन केंद्राच्या लक्षात आले आहे.

या संशोधन केंद्राचे संचालक प्रा. एस. अग्रवाल यांनीच ही बाब स्पष्ट केली असून अशा औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडे केली आहे.

 

First Published on July 8, 2015 8:20 am

Web Title: due to medicine adulteration peoples lose trust on ayurveda
Next Stories
1 फेरीवाल्यांकडून शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण
2 राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आज विविध गटांचे शक्तिप्रदर्शन
3 अभ्यागतांसाठी वेळ द्या! आयुक्तांना सरकारचे आदेश
Just Now!
X