नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून सोलापूर महापालिकेतील एका कनिष्ठ अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भाजपचे संबंधित नगरसेवक सुरेश पाटील यांच्याविरूध्द विजापूरनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन केले. बेमुदत स्वरूपात चालणारे हे आंदोलन सायंकाळी महापौर व आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले.
अ. अजीज चंदरकी (वय ५०) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात चंदरकी यांच्या पत्नी नसरून चंदरकी (रा. सहारानगर, होटगी रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक सुरेश पाटील यांनी अ. अजीज चंदरकी यांना वारंवार बेकायदा कामे करण्यास प्रवृत्त करून त्रास दिला. बेकायदेशीर कामे केली नाही तर स्वत: सुरेश पाटील हे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ व दमदाटी केली जात असे. याच कारणावरून चंदरकी हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक दबावाखाली वावरत होते. त्यातूनच त्यांनी कंटाळून स्वत:च्या घरात छताच्या पंख्याच्या हुकाला दोरी अडकावून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नी नसरीन व शेजारच्या मंडळींनी चंदरकी यांचा गळफास सोडवून त्यांना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या घटनेची माहिती पसरताच पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर कठोर कारवाईची, तसेच त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली. त्यासाठी मंगळवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनही हाती घेतले. त्यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. कामगार नेते नरसय्या आडम मास्तर व अशोक जानराव आदींनी नगरसेवक पाटील यांच्या प्रवृत्तीचा धिक्कार केला. महापौर अलका राठोड यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, दुपारी झालेल्या वाटाघाटीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.