वाहतूक व पालिका प्रशासनाची नियोजनशून्यता आणि फेरीवाल्यांचा मुक्त वावर यामुळे बोरिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेरील सर्वच रस्त्यांवर अक्षरश: अपघातांचे सापळे तयार झाले आहेत. त्यात आता भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या दबावामुळे स्थानकालगतच्या स्वामी विवेकानंद मार्गाला विभागणारे विशिष्ट ठिकाणचे दुभाजक एका रात्रीत काढण्यात आल्याने या परिसरातील वाहतूक समस्या अधिकच गंभीर बनली आहे. अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी लावण्यात आलेले हे दुभाजक अचानक काढल्यामुळे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय झालाच आहे; पण, लोकसभा निवडणुकीनंतर लागलेल्या या दुभाजकांचा असा काय अडथळा झाला की ते विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रातोरात काढण्यात आले, असा प्रश्न बोरिवलीकरांना सतावतो आहे.
सणासुदीचे दिवस असो वा नसोतस बोरिवली स्थानकाबाहेरचे पदपथ फेरीवाल्यांच्या गर्दीने नेहमीच व्यापलेले असतात. आता फेरीवाल्यांनी रस्त्यावरही आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. कधीकधी तर येथील स्कायवॉकखालील मोकळी जागाही फेरीवाले सोडत नाहीत. त्यामुळे, या रस्त्यावरील वाहतुक कायम मंदगतीने सुरू असते. येथील वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी वर्षभरापूर्वी वाहतूक विभागाच्या शिफारशीनुसार स्कायवॉकच्या खाली स्वामी विवेकानंद मार्गाला विभागणारे दुभाजक पालिकेने टाकले. त्यामुळे, वाहनांबरोबरच रहिवाशांच्याही मनमानीपणे रस्ता ओलांडण्याच्या सवयीला आळा बसला. परंतु, येथील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर, पालिकेचे प्रभाग कार्यालय आदी चार-पाच मोजक्या ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले नव्हते.
दुभाजकांच्या अडथळ्यामुळे वाहन असलेल्या खरेदीदारांना लोकमान्य टिळक मार्गावरील ‘जंक्शन’वरून वळसा घालून येणे भाग पडू लागले. त्यामुळे ‘इंद्रप्रस्थ’मधील शे-दीडशे व्यापाऱ्यांचा दुभाजकांना विरोध होता. परंतु, वाहतुकीला अडथळा करणारे हे ‘पंक्चर’ भरून काढावे, असे वाहतूक विभागाने प्रस्तावित केल्याने पालिकेने लोकसभा निवडणुकीनंतर तातडीची कारवाई करत हे ‘पंक्चर’ दुभाजकाने भरून टाकले. व्यापाऱ्यांनी अर्थातच याला विरोध केला. अगदी विधानसभा निवडणूक होईपर्यंत हे दुभाजक जागेवरच होते. पण, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच एका रात्रीत हे दुभाजक येथून काढून टाकण्यात आले.या संबंधात पालिकेचे वॉर्ड अधिकारी किशोर गांधी यांना विचारले असता आमच्याकडे वाहतुक विभागाने शिफारस केल्याने हे दुभाजक काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. ‘दुभाजक ठेवावे किंवा न ठेवावे हा निर्णय पालिका घेत नसते. वाहतूक विभागाने शिफारस केली की आम्ही दुभाजक लावतो किंवा काढतो,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
दुभाजकांचीही दुरवस्था
अर्थात या दुभाजकांमध्ये शोभेची झाडे वगैरे लावण्याचे काम अद्याप रखडलेलेच आहे. त्यामुळे, सायंकाळच्या वेळेस फेरीवाले या दुभाजकांवरही आपले बस्तान मांडू लागले.
..तरच बोरिवलीचा वाहतुकीचा प्रश्न सुटेल
बोरिवलीच्या ‘भाजप’च्या एका वरिष्ठ नेत्याने वाहतूक पोलिसांना पत्र लिहून दुभाजक काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे कळते. दुभाजक हे वाहतुक सुरळीत राहावी यासाठी असतात. अगदी गरज असेल त्या ठिकाणीच दुभाजकांमध्ये ‘पंक्चर’ ठेवले तर वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यास मदत होते. पण, आता हे पंक्चर कुठे ठेवावे यातही राजकारणी आपले हितसंबंध जपण्याकरिता हस्तक्षेप करू लागले आहेत. बोरिवलीचा वाहतुकीचा प्रश्नही तेव्हाच सुटेल जेव्हा राजकारणी आपला हा अनावश्यक हस्तक्षेप थांबवतील.