पाणलोटाचे काम यशस्वीपणे झालेल्या गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. संगमनेर तालुक्यातील काही गावातही हे काम यशस्वीपणे झाल्याने गावचा विकास शक्य झाला. पाणलोटाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरुप मिळाल्यास त्याचे चांगले यश मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे शुक्रवारी दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्यात मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, दिलासा संस्थेच्या (औरंगाबाद) अध्यक्षा डॉ. अनघा पाटील, सचिव संजीव उन्हाळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधव कानवडे, मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई मोरे, शरयू देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री थोरात यावेळी बोलतांना म्हणाले, स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आठ वर्षांपूर्वी तालुक्यात दंडकारण्य चळवळीचा जन्म झाला. या चळवळीने लोकचळवळीचे स्वरुप धारण केले आहे. तालुक्यात दंडकारण्याच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात वृक्ष संगोपन झाल्याने या चळवळीचे यश दिसू लागले आहे. तालुक्यातील मेंढवण, दरेवाडी, म्हसवंडी या भागात पाणलोटाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याने तेथील पाणीटंचाई दूर झाली आहे. दिलासा संस्थेच्या माध्यमातून आता पारेगावमध्ये पाणलोटाचा कार्यक्रम सुरु आहे. पारेगावसाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
श्रीमती पाटील म्हणाल्या की, महिला आणि पाणलोट विकास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. पाणलोटाच्या माध्यमातून पाण्याची टंचाई दर होत असल्याने माऊलीचे पाण्याचे कष्ट कमी करण्याची ताकद या पाणलोटाच्या कार्यक्रमात आहे. पारेगावमध्ये आता पाणलोटाचे काम सुरु असल्याने येत्या काही दिवसात येथील चित्र बदललेले असेल. स्व. थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये झालेले दंडकारण्याचे काम पाहून आपण भारावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, माधव कानवडे, राम खाकाळ, सुरेखा मोरे यांची भाषणे झाली.