News Flash

शेवटच्या दोन तासांकडे सर्वाचे लक्ष

मतदारांमध्ये उत्साहच दिसत नाही हो..अगदीच संथपणे मतदान सुरू आहे..उमेदवार भरपूर असूनही मतदार मात्र कमीच येत आहेत..बहुदा नेहमीप्रमाणे शेवटच्या दोन तासात रांगा लागतील..

| October 16, 2014 01:56 am

मतदारांमध्ये उत्साहच दिसत नाही हो..अगदीच संथपणे मतदान सुरू आहे..उमेदवार भरपूर असूनही मतदार मात्र कमीच येत आहेत..बहुदा नेहमीप्रमाणे शेवटच्या दोन तासात रांगा लागतील..
निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो की महापालिकेची. नाशिककरांचे सर्व लक्ष संवेदनशील म्हणून गणल्या जाणाऱ्या जुन्या नाशिक परिसरातील परिस्थितीकडे असते. लोकसभा निवडणुकीत सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लावणारे या भागातील मतदार बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या दिवशी दुपापर्यंत केंद्रांकडे फारसे फिरकलेच नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून या भागातील मतदारांची मानसिकताही स्पष्टपणे पुढे येत होती. युती आणि आघाडी तुटल्याने प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीत उतरल्याने उमेदवारांची संख्या साहजिकच वाढली. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच उमेदवार राहिले. परिणामी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागून मतदानाची टक्केवारी लोकसभेपेक्षा अधिक वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु जुन्या नाशिकमधील सर्वच मतदान केंद्रांवर दुपापर्यंत तरी हा अंदाज साफ चुकीचा ठरल्याचे दिसून आले.
पहिल्या दोन तासात तर मतदान अगदीच गोगलगायीच्या गतीने सुरू होते. मनपा उर्दू शाळा क्र. ५९ मधील २५ क्रमांकाच्या कक्षात १५५३ पैकी केवळ १०९ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. तर, २६ क्रमांकाच्या कक्षात दुपारी १२ वाजेपर्यंत ९६८ पैकी १०३ जणांनी मतदान केले होते. रंगारवाडा विद्यामंदिर हे मनपा शाळा क्र. ३५ मतदान केंद्र दुपारीही मतदारांच्या रांगा लागणारे मतदान केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. परंतु बुधवारी येथे रांगा लागलेल्या नव्हत्या. या केंद्रातील ३२ क्रमांकाच्या कक्षात सकाळी ११ वाजेपर्यंत ६४८ पैकी १७८ तर, ३३ क्रमांकाच्या कक्षात १०८१ पैकी १६५ जणांनी मतदान केले होते. कथडा परिसरातील वावरे विद्यामंदिरात २० क्रमांकाच्या कक्षात ८५९ पैकी १०२ तर, २९ क्रमांकाच्या कक्षात १५५२ एकूण मतदारांपैकी केवळ २२० जणांनी मतदान केले होते. बडी दर्गा येथील मनपा शाळा क्रमांक ३९ या मतदान केंद्रात पोहोचणे म्हणजे मतदारांसाठी एक दिव्यच. अगदीच अरूंद जिन्यावरून मतदानासाठी जाणारे आणि मतदान करून उतरणाऱ्यांची एकच गर्दी होत असल्याने वादावादी होण्याची शक्यता अधिक. परंतु मतदारांकडून शांततेची भूमिका घेण्यात येत असल्याने पोलिसांवरील ताणही बऱ्याच प्रमाणात हलका झाल्याचे दिसून आले. या केंद्रात मतदारांची काही प्रमाणात गर्दी दिसून आली. ८८ क्रमांकाच्या कक्षात १२९७ पैकी २३८ जणांचे तर, कक्ष क्र. ९१ मध्ये १३१९ मतदारांपैकी १३५ जणांनी मतदान केंल्याची नोंद होती.
शालिमार परिसरातील बी. डी. भालेकर हे मतदान केंद्रही वादग्रस्त म्हणून प्रसिध्द आहे. दिवसभर संथपणे मतदान आणि शेवटच्या तासात मतदारांनी रांगा लावणे, हा प्रकार या केंद्रासाठी आता नेहमीचा झाला आहे. या केंद्रातील कक्ष क्र. १३५ मध्ये १०५० पैकी ७८ तर, कक्ष क्र. १३९ मध्ये एक वाजेपर्यंत १००९ पैकी १८५, कक्ष क्र. १४० मध्ये ८५३ पैकी १६३ अशी मतदानाची स्थिती होती. मतदारच फिरकत नसल्याने यापैकी एका कक्षातील कर्मचाऱ्यांनी आधी पोटोबाची सोय पाहण्यास प्राधान्य दिले होते. या केंद्रावर शेवटच्या दोन तासात मतदारांकडून रांगा लावल्या जात असल्याची माहिती काही जणांनी दिल्यामुळे आधी जेवण करणे हितावह असल्याची भूमिका आपण घेतल्याचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांनी दिले.
दुपापर्यंत जुन्या नाशिक परिसरात मतदारांमध्ये असलेल्या निरूत्साहाचा परिणाम स्पष्टपणे मतदानाच्या टक्केवारीवर जाणवत होता. लोकसभा निवडणुकीत कोणी आवाहन केले नसतानाही मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत होते. या निवडणुकीत मात्र उमेदवारांची संख्या भरमसाठ असतानाही मतदार मतदानासाठी बाहेर पडत नसल्याचे दुपापर्यंत दिसून आले. मतदारांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे चिंता दिसत होती. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी मतदार बाहेर पडले नसले तरी शेवटच्या दोन तासात परिस्थिती बदलण्याची आशा त्यांना वाटत होती.
कार्यकर्ते अधिक, मतदार कमी
सकाळपासूनच पंचवटीसह रविवार कारंजा, शालिमार, जुने नाशिक भागात मतदान केंद्रांवर दुपापर्यंत मतदारांची संख्या कमी आणि कार्यकर्त्यांची अधिक असे चित्र दिसत होते. मतदान केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर दिसत असल्याने मतदानही अधिक प्रमाणावर होत असल्याचा अनेकांचा समज होत होता. परंतु मतदार अगदीच तुरळक असल्याचे दिसून येत होते.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:56 am

Web Title: dull voting in nashik vidhan sabha constituency
Next Stories
1 उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम
2 कार्यकर्त्यांच्या मग्रुरीला पोलिसांचे ‘जशास तसे’ उत्तर
3 मालेगाव मध्य मतदारसंघात रांगाच रांगा
Just Now!
X