लातूर क्लबद्वारा लातूर फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित केलेल्या पु. ल. देशपांडे राज्यस्तरीय नाटय़महोत्सवात पुण्याच्या समर्थ अॅकॅडमी नाटय़ संस्थेच्या ‘दुनिया गेली तेल लावत’ नाटकाने बाजी मारली. कल्याणच्या अभिनव नाटय़ संस्थेच्या ‘लेझीम खेळणारी पोरं’ व बीडच्या अखिल भारतीय नाटय़ परिषदेने सादर केलेल्या ‘जांभूळ आख्यान’ नाटकास अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. आमदार अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. फेस्टिव्हलमध्ये सकाळच्या सत्रात पारितोषिकप्राप्त ही नाटके पुन्हा सादर होणार आहेत. ‘दुनिया गेली तेल लावत’ नाटकास ५१ हजार रुपयांचे पहिले, ‘लेझीम खेळणारी पोरं’ नाटकास ४१ हजार, तर ‘जांभूळ आख्यान’ला ३१ हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक प्रदान केले जाईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल विक्रम पाटील, नेहा अष्टपुत्रे व प्रा. मनोज उज्जेनकर यांना पारितोषिक मिळणार आहे.
अभिनय, स्त्री अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, नाटय़लेखन या प्रकारांतील पारितोषिकेही जाहीर करण्यात आली. स्पध्रेसाठी परीक्षक म्हणून पी. डी. कुलकर्णी, सुहास भोळे व सुनीता देशमुख यांनी काम पाहिले. १५ दिवसांत २८ नाटकांचे सादरीकरण झाल्याची माहिती समन्वयक बाळकृष्ण धायगुडे यांनी दिली.