आरोग्य व शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही बाब गंभीर असल्याने परभणी पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. सध्या फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत आहेत. राज्यमंत्री फौजियाखान यांचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडण्यात आले. या अकाउंटवर खान यांचा फोटो प्रोफाइलसाठी वापरण्यात आला. दोनतीन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रोफाइलवर काँग्रेस पक्षाचे हाताचा पंजा हे चिन्हही अपलोड करण्यात आले. त्यामुळे या अकाउंटबाबत पक्ष कार्यालयातून चौकशी झाली. तेव्हा कोणी तरी माथेफिरूने खान यांचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले असल्याची बाब उघडकीस आली. श्रीमती खान यांनी पोलिसांत या बाबत तक्रार नोंदवली. गेल्या दोन दिवसांत त्या अज्ञात व्यक्तीने फेसबुकवरून पंजा चिन्ह काढून त्या ठिकाणी घडय़ाळाचे चिन्ह अपलोड केले आहे. हा प्रकार गंभीर असल्यामुळे श्रीमती खान यांचे खासगी स्वीय सहायक सचिन जोशी यांनी मंगळवारी नानल पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.